कडयावरील श्री गणपती मंदीर, आंजर्ले
कडयावरील श्री गणपती मंदीर, आंजर्ले
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश 17फ्-42' वर आणि पूर्व रेखांश 73फ्-8' वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन 1 जानेवारी 2006 पासून हा रेवस-आंजर्ले-दापोली-रेड्डी सागरी महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
मंदिराचा प्राचीन इतिहास
मंदीराचा इतिहास शोधण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि त्यांतही कोंकणातील आद्य वसाहतकारांच्या इतिहासाचा मागोवा घेणे इष्ट आहे. इतिहासकार वि.का. राजवडे यांच्या मताप्रमाणे इ.सन पूर्व 6 व्या शतकापासून महाराष्ट्रात वसाहतीला सुरूवात झाली. यांत पंजाबातून आलेले नागवंशीय (नागपूर या नावांत त्यांचे आगमन नोंदलेले आहे.), मगधांतून महाराष्ट्रिक, राष्ट्रिक आणि उत्तरकुरू प्रांतातून वैराष्ट्रिक लोक (वाई, विराटगड या नावांत त्यांचे आगमन नोंदलेले आहे.), भोज प्रांतातून सत्वक (सतीयपुत्र) लोक आले. भोजले, भोसले ही आडनावे आणि कोकणातील सावंतवाडी उर्फ सत्ववाटिका ही नांवे भोज प्रांतांतील सत्वक जमातीवरून आली. (आधार राजवाडे लेखसंग्रह. प्रकरणे 10, 12, 13). डोंगरद-यांनी व जंगलाने व्यापलेला कोकण प्रांतात फार उशीर वसाहत झाली. मुरूड आणि गुहागर या गावांच्या वसाहतीचा लेखी इतिहास पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. भविष्य पुराणांत सारस्वताच्या कोकणांतील वसाहतीचा इतिहास आहे. चित्तपावन ब्राह्मण (ना.गो. चापेकर) इतिहास 16 व्या शतकाच्या मागे जात नाही. अस्तु.
आंजर्ले गांवच्या गणपती मंदिराच्या निर्मितीचा इतिहास शोधता आपण 11 व्या शेतकांपर्यत मागे जातो. 12 व्या शेतकांत मंदिर निर्मिती समवेत मंदिरासमोरील तलाव आणि मंदिरा सभोवतालची तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. हे प्राचीन मंदीर (बहुधा) लाकडी खांबावरील कौलारू किंवा गवताच्या छपराचे असावे. कमानींची रचनापध्दती भारतात अज्ञात असण्याच्या काळांत आणि कोकणांत आढळणा-या जांभ्या दगडाच्या उपयोगाला मर्यादा असल्याने लाकडी खांबावर आधारित मंदिर रचनेला अन्य पर्याय नव्हता. जांभा दगड ढिसूळ असून मुरूमापासून बनलेला द्वितीय श्रेणीचा दगड आहे. (सेकंड जनरेशन स्टोन).
मंदिराचा अर्वाचीन इतिहास आणि मंदिवर्ण
मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक राकृष्ण भट हरि नित्सुरे यांना स्वप्नाष्टांत झाला की, या फार जीर्ण झालेल्या मंदिराच्या जागी अत्यंत त्वेरेने नवीन मंदीर बांध (जीर्णम् गृहमसुढम् अत्र विधेहि शीघ्रम). हा आदेश झाल्यावर रामकृष्णांनी दादाजी घाणेकर (पुणे) आणि रघुनाथ कृष्ण भट (धारवाड) यांचे आर्थिक सहाय्य घेऊन मूळ मंदिराच्या जागी आज विद्यमान असणारे जांभ्या दगडाने कलशयुक्त मंदिर नव्याने उभारले. हे काम इ.स. 1768 ते 1780 इतका काळ चालून एकूण खर्च रू. 50 हजार आला. (आजच्या भाषेत सुमारे साडेतीन कोटी रू.) भक्त जनांनी गणपतीचे पाऊल पाहावे.
मंदिराच्या रचनातंत्राची वास्तुशास्त्रीय माहिती
या पूर्वाभिमूख मंदिराची लांबी 55 फूट, रूंदी 39 फूट आहे. या मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय (वाकाटक कालीन), मध्ययुगीन रोमन (बैझंटाइन ) आणि अर्वाचीन पाश्चात्य (गोथिक) वैशिष्टयांचा एकजीव कलात्मक संगम केलेला आहे. वाकाटक राजकालांत (इ.250-550) महाराष्ट्रांत त्रिस्तरीय मंदीर रचनेचा आरंभ झाला. या पद्धतीत गर्भागार, सभागार आणि दोहोंना जोडणारा अंतराल असे तीन भिन्न विभाग असतात. (अंतरालामध्ये घंटा टांगल्या आहेत.) नेमके हेच रचनातंत्र गणपती मंदीरात वापरेलेल आहे. मात्र हे साम्य येथेच संपते.
सभागाराला 8 कमानी आहेत तर गर्भागारांतही 8 कमानी आहेत. कमानी उभारण्याचे तंत्र प्राचीन असले तरी भारतात ही पद्धती 15 व्या शतकात प्रचलीत झाली. या पद्धतीत भिंतीचे संपूर्ण वजन वरील घुमटासह भिंतीच्या पायावर परावर्तित करतात.
प्रगत तंत्रशुध्द पद्धतीची घुमटाकाराची रचना असलेले सेफिया कॅथेड्रल कॉन्टॅन्टिनोपल येथे (इ.स. 532-537) बांधण्यात आले. (बैझंटाइन पद्धती). घुमटाकाराची बांधणी करण्यापूर्वी चौरस चार भिंतीचे अष्टकोनांत रूपांतर करण्याची युक्ती वापरत. नेमके हेच बैझंटाइन तंत्र या मंदीराच्या सभागाराच्या आणि गर्भगारावरील घुमटांची बांधणी करताना वापरले आहे. (सतराव्या शतकात ही पद्धती दक्षिण भारतात आली. इ. 1630 विजापूरचा गोलघुमट).
गर्भगारांच्या शिखरांची बांधणी करताना एक वैशिष्टयपूर्ण तंत्राचा वापर केलेला आहे. गर्भगारावरील पहिला घुमट आतल्या बाजूने 35 फूट उंच आहे. तो बांधण्यापूर्वी चार चौरस भिंतीचे अष्टकोनाकृतीचे आठ पाय गर्भगाराच्या जमिनीवरील टेकलेले असल्यारले गर्भगाराची आतील बाजू पूर्णपणे अष्टकोणी आहे. घुमआच्या शिराकेबिंदुवरील उमलत्या कमल पुष्पाच्या पाकळयांचे डिझाईन होते. काळाच्या ओघात या दगडांचे विघटन होऊन इ.स. 2002 मधे ही कमलाकृती कोसळून पडली. अंतरालाच्या पटृटीत उत्तर-बाजूने मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे. गच्चीवर जाऊन पुढील वर्णन पाहावे. गर्भगाराच्या 4 भिंती बाहेरच्या बाजूने पुन्हा वर उचलून गच्चीवर पाच फूट उंचीचा चौरस करून पुन्हा एकदा त्याचे अष्टकोनाकृती रचनेत रूपांतर केले आहे. या उचललेल्या भागातच गर्भागारांत सूर्यप्रकाश व उजेड येण्यासाठी द्वार ठेव्ाले आहे. गच्चीवरच्या गर्भगारावरील या दुस-या अष्टकोनी रचनेच्या आधाराने दुसरा एक सुमारे 10/11 फूट उंचीचा व आतून पोकळ असलेला घुमट उभारला आहे. या दुस-या घुमटाचा बाह्यभाग नानाविध आकृतिबंधानी आणि वेलबुट्टीने परिवेष्टित असून 16 उपकलश आणि अष्टविनायकांच्या प्रतिमा यांनी नटलेला आहे. (कळसावरील या दुस-या घुमटात प्रवेशासाठी असलेले छोटेसे द्वार द्वितीय जिर्णोधाराच्या वेळी इ. 1991 मध्ये बंद करून त्या जागी मोरगावच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली.) या दुस-या घुमटाच्या वर कलशाकृति शिखर कमलदलांवर विसावले असून त्याची निमुळती अग्रशिखा (Tapering point) अवकाशाचा भेद करीत आहे. बैझंटाइन पद्धतिचा घुमट उपडया हंडीच्या आकाराचा (मेणबत्ती लावण्याच्या हंडीसारखा) असतो. या घुमटांचे हिंदूकरण करताना त्या वेळच्या स्थपतीनी विलक्षण चातुर्य प्रकट केले आहे. या सर्व घुमटांच्या शिरोबिंदूवर कमलपुष्प आहे. तर बाह्य भाग कलशाकृती असून त्याच्या बैठकीच्या जागी कमळाच्या पाकळयांची वेलबुट्टी आहे. गर्भगारावर एकूण 12 कळस आहेत.
गर्भगारावरील दुस-या घुमटाची रचना करताना अवशिष्ट चारी कोप-यात उंच मनोरे (पिनॅकल्स अथवा टेपरिंग स्पायर्स) बांधण्यात आले. अशा त-हेने मनोरे युरोपात प्रबोधन काळात बांधलेल्या (गोथिक स्टाईल) ख्रिस्त मंदिरात 12 व्या आणि 13 व्या शतकात प्रथम बांधण्यात आले. युरोपातील मनोरे निमुळते टोकदार असतात, तर आपल्या मंदिरात त्यावर संस्करण करून कलशांची स्थापन केलेली आहे.
तीन विभिन्न संस्कृती आणि विभिन्न कालखंडातील वास्तूरचना तंत्रांचे संमिलन करताना त्यांना एकात्म भारतीय परिवेश देणारे कलाकार धन्य होत.
सभागारावरील बसक्या आणि दणगट (Massive) बांधणीचा घुमट पृथ्वीशी आणि जडतेशी नाते जोडतो. उलटपक्षी गर्भागाराचे अवकाशात झेपावणारे नाजूक निमुळते शिखर अनंत आकाशाशी सख्य जोडते. त्यामुळेच सौंदर्यद्रुष्टी असलेल्या भक्ताला सभागारांत प्रवेश करतांना सान्तामधून अनंतात आणि जडतेतून चैतन्याकडे प्रवास केल्याचा प्रत्यय येतो.
मंदिराला लाभलेले सौदर्याचे वरदान
आंजर्ले गावाला विस्तृत किनारा लाभला आहे. सागर किनारी आणि खाडी काठची भरती-ओहोटीच्या वेळची जनक्रीडा पाहणे हा संस्मरणीय अनुभव आहे. सदाहरित वृक्षराजीची शाल पांघरून अत्यंत नीरव वातावरणात गाव पहुडलेले असते. पक्ष्यांच्या मंजूळ कूजनाने आला तर आल्हादकारक व्यत्यय येतो. मंदिराचे पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरूनच भक्तमंडळिंना खुणावत असतात. गर्द झाडीत लपलेल्या मंदिराची मानवनिर्मित कलाकृती केवळ अनुपम आहे. पण या सगळया चराचराशी एकदा भावनिक तादात्म्य साधले की सकाळ संध्याकाळच्या रंगांनी रंगलेले मंदिर, चांदण्यांच्या धूसर प्रकाशात आणि पौर्णिमेच्या सुधारसांत स्नान करणारे मंदिर, पावसाळयातील सागराचे रक्तरंजित तांडव आणि त्याचवेळी धुवाधार पावसांत सचैल स्नान करणारे मंदिर, असे सौदर्याचे परोपरीचे आविष्कार केवळ रसिक मनालाच जाणवतात. दृक् प्रत्ययापलीकडील आनंदभूमींत जाण्याची किमया, हे तर देणे ईश्वराचे.
मंदिराचे एकमेवाद्वितीय वैशिष्टय
इ.स. 1780 मध्ये बांधलेल्या या मंदीराला इ. 1990 मध्ये 210 वर्ष पूर्ण होत होती. या 210 वर्षाच्या कालावधीत ऊन-पाऊस-वारा आणि हवेतील क्षाराने मंदिराचे बाह्यलेपन ढिसूळ व सच्छिद्र बनले होते. नित्सुरे व्यवस्थापनाचे मंदिर जीर्णोध्दाराचे काम हाती घेवून 30 नोव्हेंबर 1990 ते 24 फेब्रुवारी 1996 (प्रत्यक्षकामाचे दिवस 439) या कालावधीत जार्णोध्दाराचे काम पूर्ण होईल. थोडा तपशील माहितीसाठी आवश्यक आहे.
अ) हे दुरूस्ती काम करताना अत्याधुनिक केमिकल्य रिवविली. नंतर बाह्यांगाची दुरूस्ती केली ( कॉस्मेटिक रिपेअर). या कामी वापरलेली केमिकल्स 1. डिस्टामेंट डी. एस.पावडर, 2. नाफूफिल बी.बी.2, 3. इएमसीक्रीट, 4. डिस्टामेंट डीएम (लिक्किड), 5. नाफूक्किक पावडर, 6. प्रासमेक्स, 7. डिस्टामेंट डी.एम. पावडर, 8. इएमसी कलर फ्लेक्स (लिक्किड), 9. रूफेक्स 2000(बाह्यरंग), 10. सीमेंट. कळसांच्या व बाह्य भागाच्या दुरूस्तीला रू. 4,01,988 इतका खर्च झाला.
ब) मंदिराच्या अंतर्भागाची दुरूस्ती उदयपूर (राजस्थान) येथील राजप्रसाद आणि भव्य मंदिराच्या पद्धतीने केल्याने आतल्या भिंती आणि घुमटांचा भाग जण संगमरवरी दगडाचा असल्यासा भास होतो. या कामात फार कौशल्य व प्रदीर्घ अनुभव असावा लागतो. यासाठी उदयपूर परिसरातून कारागीर आणवले होते. यात आरास (संगमरवर दगड भट्टीत भजून बनवलेला चुना) आणि जिंकी (संगमरवर दगडाची बारीक रेती) यांचा वापर होतो. खर्च रू. 1,54,716 इतका झाला. जीर्णोद्धारचा एकूण खर्च रू 8 लक्ष15 हजार 794 इतका झाला.
मंदिर व्यवस्थापन पद्धती
या प्राचीन मंदिराचे निर्माते आणि व्यवस्थापक कोण होते याचा इतिहास अज्ञान आहे. इ.स.1630 पासूनचा (म्हणजे छत्रपती शिवाजी जन्मकालापासून) इतिहास ज्ञात आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे लेखन हा व्यवस्थापक कुटुंबाच्या 12 व्या पिढीचा प्रतिनिधी आहे. सतत 12 पिढयांपर्यत या देवस्थनाचे व्यवस्थापन (वेदशाळाकूट) नित्सुरे घराण्याकडे नांदले.
भारतावरील ब्रिटीश सत्तेचा अस्त झाल्यावर लोकशाही पद्धती भारतात स्थिरावली. सामाजिक समतेच्या युगाची नांदी झाली. आज या मंदिरात कोणत्याही जातीच्या (ब्राह्मण, भंडारी, कूणबी, महार, चांभार) गणेशभक्ताला स्वहस्ते श्रीपूजा करण्याचा अधिकारी आहे. यासाठी नित्सुरे विश्र्वस्तांनी पुढाकार घेऊन आवश्यक ती घटना दुरूस्ती केली आहे. (अर्ज क्र. 126/1982 वरील धर्मादाय आयुक्त निर्णय पत्र दि. 6 जून 1983 घटना कलम 27.All Hindus shall have the right to to attend and worship the Diety......etc.... )
नंतर नित्सुरे विश्र्वस्तांनी पुढचे पाऊल उचलून या मंदिराचे दरवाजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आदि सर्व धर्मियांसाठीखुले केले. आज सर्व धर्मीयांसाठी या विश्वात्मक, विश्वाधार, मूलाधारस्थित, ॐ कार स्वरूप श्रीगणेशाचे मुक्त दर्शन करता येते. शिव: अद्वैत: एवम आत्मा एव। (मांडुक्य उपनिषद) अशी ही गणेशदेवता भक्तांवर सदैव अनुरक्त असते.
नव्या युगाच्या हाकेला ओ देऊन नित्सुरे कुटुंबियांनी समयोचित निर्णय घेऊन 29 सप्टेंबर 1996 या दिवशी देवस्थान विश्वस्त मंडहाचा कारभार सर्व समाजाचे प्रतिनिधी असणा-या ग्रामस्थ विश्वस्तांकडे हस्तांतरित केला.
गणेश वंदना
मंदीरातील ऋध्दिसिध्दिसहित वरदहस्त सिध्दिर्विंनायकाच्या मूर्तींचे ध्यान प्रसन्न, गंभीर, महातेजस्, आनंदमय, मांगलिक आणि अभय देणारे आहे. तुकोबांच्या शब्दांत
अनंता, अरूपा, अलक्षा, अच्युता। जालासी साकार भक्तकाजा।
जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।......
ज्यासी आपंगिता नाही। त्यासी धरी जो हृदयी ।।......
मंदिरात त्याचप्रमाणे अशा भक्ताच्या घरी देवाचे वास्तव्य असते.
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की तुम्हाला ईश्वर दर्शन हे असल तर लोकसेवेला, लोकल्याणाच्या कामाला वाहून घ्या म्हणजे लोकांच्या ठिकाणी ईश्वर दर्शन होईल.
भक्तिमार्गावरील एक अभिनव दिशा
तुकाराम आणि विवेकानंद यांच्या मार्गदर्शनानूसार आजमितीस सामाजिक समता आणि सामाजिक अभिवृध्दि या कामांना विश्वस्तांनी वाहून घेतल्याने शिक्षण निधि, समाजकल्याण, निधी, ग्रंथालय निधी, क्रीडा विविधा निधि, वृक्षारोपण निधी असे उपक्रम देवस्थानन्यासाने कार्यान्वित केले आहेत.
आवारातील शंकराच्या मंदिराचा जीर्णोध्दार
10 फेब्रुवारी 10 मे 2004. मंदिराच्या काळया दगडांतील सांधे 10-10 या केमिलिने भरण्यात आले. नंतर दगड भिंतीवर BECKBON Pu 24 A हे केमिकल चोपडयात आले. घुमटाकार लोखंडी जाळी अबसवून सीमेंट लावताना MICRO SILICA ( रेशमाचे धाके) 168 किलो मिसळण्यात आले. अन्य तपशील गणपती मंदिर जीर्णेध्दारप्रमाणे. खर्च रू. 2 लक्ष 21 हजार 134.
भक्तिधाम निर्मिती
भक्तजनांची दीर्घकालीन अपेक्षा पुरविण्यासाठी देवस्थान विश्वस्थानी (खर्च रू 14,67,927) भक्तिधाम वास्तुनिर्मितीचे काम अग्रक्रमाने हाती घेतले. त्रिपुरा पौर्णिमा 19 नोव्हेंबर 2002 या दिवसापासून भक्तिधाम अभिजनांच्या वास्तव्यासाठी सुसज्ज आहे. मंदिरात दर्शनार्थी भक्तांच्या दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे निवांत उपासना आणि नामस्मरण करण्यासाठी गणपती मंदिराचे एक उपांग म्हणून एकांत ध्यानधारणेसाठी भक्तिधाम बांधण्यात आले.
अंतिम चरणात नि:शुल्क वास्तव्य व्यवस्था हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. मात्र भक्तिधामाच्या14 लक्ष रूपये खर्चावरील प्रतिवर्ष घसाराच रू. 73 हजार येतो. (Sliding System Depreciation). केवळ एवढयासाठीच एक तात्पुरती व्यवसाय म्हणून सध्या भक्तिसाधना स्थायी निधीसाठी स्वेच्छा देणगी देणारास निवास व्यवस्था अग्रक्रमाने उपलब्ध केली आहे.
दापोली परिसरातील पक्षिजीवन
दापोली परिसरातील पक्षिजीवन
बाणकोट ते दाभोळची खाडी या दरम्यानच्या वालुकामय सागरतटावर मोठया प्रमाणावर पांढरे शुभ्र गल पक्षी थंडीत येतात. हर्णे-मुरूड या किनारपट्टीवर दुर्मिळ पांढ-या रंगाचे, छोटेखानी, निमुळत्या आकाराचे, काळा तुरा असणारे सँडविच टर्न पक्षांचे थवे आपण पाहू शकतो. काही हजारांच्या संख्येत येथे समुद्री गल पक्ष्यांचा वावर सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान असतो. नंतर हळूहळू हे पक्षी इतर खाडयांवर विशुरतात. या पांढ-या शुभ्र गल पक्ष्यांमुळे सागर किना-याची शोभा वाढते. एकीकडे फेसाळणा-या लाटा आणि किना-यावर उतरवणारे पांढरे शुभ्र पक्षी असे विलोभनीय दृष्य पाहायला मिळाले की निखळ आनंदाची प्रचीती मनास येते. गल पक्षी उडताना त्यांचे गोल टोकांचे पंख अन बोथट शेपटी यामुळेते सहज ओळखता येतात.
इथल्या खारफुटीच्या जंगलामध्ये इवलासा, निळसर हिरवर स्मॉल ब्लू किंगफिशर आणि क्वचित प्रसंगी रंगेबिरंगी ऐटबाज युवराज किंवा ओरिएंटिल किंगफिशर दिसतात. समुद्राप्रमाणे निळा रंग असणारा व्हाइर्ट कॉलर्ड किंगफिशर सुध्दा पक्षी निरीक्षकांच्या पाहणीत आढळला आहे. त्याचबरोबर अंगठयाएवढी व्हाईट बॅक्ट मुनीया, स्ट्रॉबेरीत दिसणारी लाल मुनीया, ठिपकेवाली मुनीया, करडया रंगाचा ग्रेट रिड रिड वार्बलर किंवा बोर वटवटया, लाल डोक्याचा, हिरवट रंगाचा, शेपटी नाचवणारा शिंपी यांसारखे नेहमी दिसणारे छोटे पक्षीही दिसतात. सुरूच्या बनातून फिरताना पांढ-या पोटाचा, करडया पंखाचा आणि बाकदार चोचीच्या समुद्र गरूडाचेही दर्शन घडते.
पक्ष्यांची अधिक माहिती आणि त्यांना ओळखण्याच्या पध्दती यासाठी एखादे पुस्तक प्रवासात बरोबर ठेवल्यास त्यासंदर्भाने अधिक जवळून पक्षिजीवन न्याहाळता येईल.
मांसल, गुबगुबीत समुद्री ससा सी हेअर, स्टार फिश, काटेरी सी आर्चीन, ऑलिव्ह रिडले अर्टल यांसारखे समुद्र प्राणी, शंख-शिंपल्यांचे विविध प्रकार देखील आपण या भागात समुद्रटाकी फिरताना पाहू शिकतो.
आसूद बाग
आसूद बाग
नारळी-पोफळीची गगनाला भिडणारी झाडं, त्यामधून खळखळात वाहणारे पाण्याचे पाट, जागोजागी ओल्या सुपा-या, छपरावर घातलेली वाळवणं आणि शांत-निवांत अशा टुमदार वस्तीचे आसूद हे गाव डोंगरउतारावर विसावलेले आहे. दापोलीहून बुरोंडी पोलिस नाक्याहून सरळ गिम्हवणे मार्गे गेल्यास 15/20 मिनिटांत केशवराज मंदिराकडे असा फलक आपल्याला खुणावतो आणि गाडी तीव्र उतारा-या रस्त्याला लागते. सकाळच्यावेळी या परिसरात असंख्य पक्ष्यांचे कूजन सुरू असते. निसर्गही आपल्या फुलांचा गालिचा पसरून आपल्या स्वागताला सज्ज असतो. या गावात आणि ओढयाच्या काठी श्री.ना.सी. पेंडसे यांच्या कादंबररीवर आधारित गारंबीचा बापू या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.
केशवराज मंदिर
आसूद बागेतील डोंरावर श्री केशवराज (लक्ष्मीकांत) मंदीर आहे. मुख्य रस्त्यावर गाडी ठेवून आसूद गावातून उतरणीने पाण्याच्या ओढयापर्यंत चालत जावे लागते. या ओढयावर पूर्वी साकव म्हणजे लाकडी पूल होता. त्याचे काही खांब पाहायला मिळतात. आता पक्का सिमेंटचा पूल झाला आहे. पावसाळ्यात व साधारण सप्टेंबर अखेरपर्यंत हा ओढा खळाळत असतो. पुलावरून आढा ओलांडल्यावर दगडी पाय-यांची चढण लागते. 10/15 मिनिटांची थोडीशी दमछाक करणारी ही चढण चढूण गेल्यावर मात्र आपण पोहोचतो त्या ठिकाणी एकदम थंडगार हवेच्या स्पर्शाने सगळा थकवा निघून जातो. चारही बाजूने दाट झाडह असलेला हा केशवराज मंदिराचा परिसर काहीसा गृढरम्य वाटतो. हे मेदिर पेशवेकालीन बांधणीचे असून मूळ मंदिरावर पावसापासून बचाव करण्यासाठी कौलारू छप्पर घातलेले आहे. समईच्या शांत प्रकाशात दिसणारी श्री. विष्णूची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. दक्षिणमुखि असलेल्या या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेशमूर्ती आहे. मंदिराला चारही बाजूने दगडी फरसबंदी आहे. येथील वैशिष्टय म्हणजे सतत 12 महिने गोमुखातून पाणी वाहत असते. या पाण्याचा उगम त्या पाठीमागील डोंगरातून झालेला आहे. तेथपर्यंत चढून जाता येतो. हा जिवंत झरा वर्षानुवर्षे वाहत आहे.
गावात घरगुती राहण्याची व भोजनाची माफक सोय आहे. मात्र त्यासाठी किमान तास-दोन तास आगाऊ सूचना द्यावी लागते. गावातच काही अस्सल कोकण्सी घरगुती पध्दतीचे पदार्थ विकत मिळतात.
व्याघ्रेश्वर मंदिर
व्याघ्रेश्वर मंदिर
आसूदच्या रस्त्याने जोशी आळीच्या पुढे रस्त्शलगतच व्याघ्रेश्वर मंदिराचा भथ्त-निवासा बोर्ड दिसतो. य्त्या आवारातील पाठीमागच्या बाजूने व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाता येते. किंवा पुढे पुढे जाऊन कच्या रस्त्याने थेअ मंदिरापर्यत गाडी नेता येते. किमान 800 वर्षांपासूनचे शंकराचे जागृत स्थान असून अनेकांचे कुलदैवत आहे. आसूद गावातून वाहणा-या ओढयाच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूने सुमारी 5 फूट उंचीची दगडी भिंत आहे. आत प्रवेश करताच दिप माळ दिसते. मंडप व गर्भग्रह अशी रचना असून मंडपातच सूमारे 3 फूट पाषाण नंदी आहे. त्यावर काही मानवाकृतीही कोरलेल्या आहेत. आतल्या बाजूस लाकडी खांब असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. शिव मंदीरात दशावतार कसे, असा प्रश्न पडतो. परंतु शिव आणि वैष्णव पंथ ज्या काळात होते. त्या काळात जिर्णोध्दार करणारी व्यक्ती ज्या पंथची असेल त्याचा प्रभाव पडत असावा. मंदिराच्या बाहेरच्या बाजूनेही कोरीव काम केलेल्या दगडी फरश्या बसवलेलया आहेत. मंदिराच्या शेजारी एक विहीर असून आश्चर्य म्हणजे त्यावरील बांधकामाच्या तळाशी लाकडी चौकट असल्याचे सांगितले जाते. दक्षिणेकडील एका स्त्रीने 700 वर्षापूर्वी या मंदिरातील लाकडी बांधकाम करवले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही प्राचीन मूर्ती दिसतात. त्यामध्ये अजिंठयाच्या शिल्पाशी साम्य असलेल्या काही भग्न परंतु अलंकारिक एक उभी आणि एक आडवी पडलेली विरगळ दिसते. लढाईतील वीर योध्दांच्या स्मरणार्थ किंवा विजया प्रित्यर्थ अशी स्मरकी उभारली जात.
मुरूड
मुरूड
आसूद पूलापाशी डावीकडे वळून आपण थेट मुरूड गावात पोहोचतो. (अलिबाग जवळिल मुरूड-जंजिरा यांच्याशी याची गल्लत करू नये. दोन्हीही मुरूड वेगळे आणि एकमेकांपासून 100 कि.मी. अंतरावर आहे.) दापोलीतील मुरूड हे भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. त्यांचे बालपण याच गावात गेले. गावात प्रवेश केल्यावर चौकातच उजव्या हाताला त्याचा अर्ध पुतळा दिसतो.
समोर दिसणा-या दुर्गादेवी मंदीराच्या डावीकडचा रस्ता आपल्याला थेट समुद्रकिनारी घेवून जातो. अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित अशा या किना-यावरुन उजव्या बाजूस सुवर्ण दुर्ग, कनक दुर्ग, हनेंचा दिपस्तंभ दृष्टीस पडतो. ओहोटीच्या वेळी चालत ही तेथे जाता येते. या गावाची रचना आखीव-रेखीव आहे. संपूर्ण गांवात अतिशय स्वच्छता आढळते. गांवाच्या गल्ली-बोळातून निवांत फेरफटका मारताना कोकणच्या खास जीवन पध्दतीचे, घरांचे निरीक्षण करता येते. गांवात घरगुती तर समुद्रकिनारी नारळी-कोफळीच्या सावलीत अनेक रिसोर्टस् आहेत. उत्कृष्ट भोजन आणि किना-या लगतची सुंदर रचना यांमुळे मुरूड ची रिसोर्टस् लोकप्रिय आहेत.
दुर्गादेवी मंदिर
मुरूड गावात शिरणारा मुख्य रस्ता या मंदिरापाशी थांबतो. पेशवेकालीन बांधणीचे हे दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर असून देवीचे स्थान स्वयंभू आहे, असे मानतात. मंदिराच्या पुढयात दोन मजली नगार खाना व दगडी दीपमाळ आहे. पाठीमागे खोदलेला तलाव आहे. मंदीराच्या पाय-यांपाशी डावीकडे वरच्या बाजूस एक भली मोठी पितळी घंटा नजरेस पडते. चिमाजी अप्पांनी वसई जिंकलयानंतर तेथील चर्च मधील काही पोर्तुगीज घंटा इकडे आणून मंदिरांना अर्पण केल्या आहे, त्यापैकी ही एक. त्याच्या बाहेरील बाजूवरचा पोर्तुगीज भाषेतील मजकूर स्पष्ट दिसतो.
मंदिराच्या आतिल भागात लाकडी खांबावर केलेले अप्रतिम नक्षीकाम आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्यातील एका स्तंभ शिरावर एक नागाकृती कोरलेली आहे. नवरात्रात तेथे दुर्गादेवीच्या उत्सवात मोठी जत्रा भरते.
तळयातला गणपती
या गांवातील तळयात एक गणपतीचे स्थान आहे. पावसाळयात तलाव पूर्ण भरला की ही मूर्ती पाण्याखाली जाते. उन्हाळयात मात्र पाणी अटल्यावर भाविकांना दर्शन घेता येते.
महर्षी स्मृती स्मारक
मुरूड गावातच महर्षी स्मृती स्मारक नुकतेच उभारण्यात आले आहे. 1891 साली महर्षी कर्वे यांच्या पुनर्विविहाचा योग ज्या वझे कुटुंबियांनी जुळवून आणला त्याच कुटुबातल्या विद्यमान पिढीने स्वत:च्या खाजगी जागेत हे कार्य स्वप्रेरणेने केले आहे. या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्या दैनंदिन वापरातील वस्त, जगभरातील नामवंतांबराबरची त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांचा पुतळा याद्वारे जीवनचित्रसंग्रहालयाची मांडणी करून त्यांना आदरांजली वाहिली बाहे. स्त्रीला समाजात स्थापना प्राप्त करून देणा-या महर्षी कर्वे यांच्या या स्मारकाला भेट देऊन वंदन करणे ही गोष्ट प्रत्येकाने आवर्जून करावी. त्यांच्या जीवनकार्याची ओळख आणि जीवनपट सांगणारी माहितीही त्या ठिकाणी लावण्यात आली आहे. प्रवेश सर्वांना खुला व विनामूल्य आहे.
कर्दे
कर्दे
मुख्य रस्त्यावरून मुरूड गावाकडे जाताना डावीकडच्या रस्त्याने आपण कर्दे या निसर्गरम्य आणि सुरक्षित सागरकिनारी पोहोचतो. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरूड, कर्दे परिसरात स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने येतात. पांढ-या शुभ्र लाटा , आकाशात झेपावणारे हजारो पांढरे सीगल पक्षी तास न् तास पाहत राहावे, असे वाटते. तेथून पावसाळा सोडून इतर मोसमात बोटीने खोल समुद्रात जाऊन डॉल्फिन मासे पाहण्याची सागरी ससेफरही करता येते.
आंबवली - गणपती मंदिर
आंबवली - गणपती मंदिर
मुरूडहून हार्णेकडे जाताना आसूद नाक्यापासून एक कि.मी. अंतरावर उजव्या हाताला शेतामध्ये मंदिरात स्वयंभू, चतुर्भुज, उजव्या सोंडेच्या गणेशाचे प्राचीन मंदिर आहे. एक-दीड फूट उंचीची कमलासनावर विराजमान झालेली ही संगमरवरी मूर्ती पेशवेकालीन वाटते. मूर्तीच्या हातात कमळ, परशु, मोदक आणि माळेसदृश वर्तुळाकार कोरलेले दिसतात. दर संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची खूप गर्दी असते.
हर्णे
हर्णे
गोवा किल्ला
हर्णे बंदराकडे जाताना वळणावर समोर दिसतो तो गोवा किल्ला. काळया दगडी चि-यांच्या मजबूत तटबंदीत किल्लयांचे प्रवेशद्वार दिसते. दरवाजातून आत गेल्यावर तटावर मारूतीची मूर्ती आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंस तळाशी वाघासारखे शिल्प कोरले आहे, तर डाव्या हाताला गंडभेरूड व त्याने पकडलेल्या चार हत्तींचे वैशिष्टयपूर्ण शिल्प आहे. उजव्या हातास हत्तींच्या आकृती कोरलेल्या आढळतात. किल्लयात एकही इमारत शिल्लक नाही, परंतु काही जोती दिसतात. तटबंदी मात्र थोडीशी पडझड वगळता सुस्थितीत आहे. त्यावर चढून जाण्यासाठी जागोजागी पाय-या आहेत. तटावरून पाण्यात दिसणारा सुवर्णदुर्ग आणि तटाच्या भिंतीशी समुद्राच्या लाटांचा चाललेला खेळ जळवून न्याहाळता येतो. येथून सुवर्णदूर्गाच्या पाठीमागे अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याचे छायाचित्रण हे एक आव्हान आहे. वेगवेगळया अँगल्समधून दिसणारे हे दृश्य विलोभणीय आहे. हा देखावा म्हणजे तुमच्या अंजर्ले सहलीच्या आनंदाला लाभलेली सोनेरी किनार आहे. सध्या मात्र किल्याच्या रस्त्यालगतच दरवाजा बंद असून समुद्राच्या बाजूला सुवर्णदुर्गाच्या दिशेला जिथे तटबंदी पडली आहे. तेथून आत प्रवेश करावा लागतो.
फतेगड
गोवा किल्यापासून थोडे पुढे आल्यावर कस्टम ऑफिसच्या उजवीकडे एक टेकाड दिसते. या ठिकाणी पूर्वी फतेगड होता. तो सुवर्णदुर्गाचा उपदुर्ग म्हणून समजला जात असे. या किल्लयाच्या ठिकाणी आता कोळी वस्ती असून, तटबंदी पूर्ण पडून गेल्याने किल्लयाच्या खुणा पूर्णपणे हरवून गेल्या आहेत. बंदरावरील दीपगृहाकडे जाताना पहिल्या बुरूजापासून मागे वळून पाहिल्यास जे टेकाड व कोळी वस्ती दिसते तेच गोवा किल्याचे नेमके स्थान. भरतीच्या वेळी किल्याच्या पासथ्याशी , खडकांवर आपटून उसळणा-या लाटांमध्ये मनमुराद भिजता येते.
कनकदुर्ग
फतेगडहून मोटार रस्त्याने धक्क्याकडे जाताना डाव्या हाताला दोन पकडे बुरूज दिसतात. त्या मधून गेलेल्या पाय-याने वर चढून गेल्यावर समोर समुद्रात सुवर्णदुर्ग दिसतो. या बुरूजांपासून दीपस्तंभापर्यंत कनकदुर्गाचा विस्तार होता. आता मात्र थोडीच तटबंदी शिल्लक आहे. कनकदुर्ग आणि फतेगड सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग आहेत. याची उभारणी कोणी व केव्हा केली याबाबत मतभेद आहेत. तथापि 18 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात याची निर्मिती झाली हे निश्चित.
दीपस्तंभ
कनकदुर्गाची पाय-यांनतरची चढण चढूण गेल्यावर आपण हर्णेच्या दीपस्तंभापाशी पाहोचतो. हे दीपगृह शंभर वर्षांपेक्षा जास्त पूर्वीचे असून, महाराष्ट्र कोकण किनारपट्टीतील वापरात असलेले सर्वांत जुने दीपगृह आहे. मच्छीमारी बोटींसाठी याचा उपयोग होतो. दंडगोलाकार अशा या दोन मजली दीपगृहावर सोलर सिस्टीम बसवली असल्याने वर जाता येत नाही. येथून सुवर्णदुर्ग, हरिहरेश्र्वरचा डोंगर, कडयावरचा गणपती, हार्णे बंदर, मुरूड-कर्देचा समुद्रकिनारा आणि थेट दाभोळाच्या खाडीपर्यंतचे विलोभणीय दृश्य दिसते. कर्मचा-यांशी संवाद साधून दीपगृहाच्या सिग्नल्सची माहिती आवर्जून घ्यावी. या परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे.
हर्णे बंदर
हर्णे बंदरालगत कोळी व मुस्लिम वस्ती मोठया प्रमाणावर आहे. पूर्वी वाहतूकीची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा जलमार्ग वाहतुकीतील हर्णे हे महत्वाचे बंदर होते. येथे मासेमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. विशेषत: सायंकाळी 4 ते 7 या वेळात चाललेला माशांचा लिलाव पाहण्या-ऐकण्यासारखा असतो. लाखो रूपयांची उलाढाल करून हे मासे परदेशीसुध्दा निर्यात केले जातात. बंदराच्या रस्त्यावर अनेक मोठयामोठया मासेमारी बांटींची बांधणी, देखभाल, दुरूस्ती ही कामे चालतात. पाण्याखालचा बोटीचा तळ, त्याची रचना पाहण्यासारखी असते.
कॅथॉलिक चर्च
हर्णे गावाकडून पाजपांढरी गावाकडे जाताना साधारण तीन कि.मी. अंतरावर उजवीकडे डोंगराच्या पायथ्याशी कॅथॉलिक पंथाच्या चर्चची पांढरी इमारत दिसते. हे चर्च साधारणत: 200 वर्ष जुने असावे. परंतु नेमकी माहिती मिळत नाही. जुने लाकडी नक्षीकाम असलेले 12 ते 15 फूट उंचीचे भव्य ऑल्टर वेदी असून मदर मेरी, येशूच्या मूर्ती, क्रॉस व काही तसबिरी ठेवलेल्या आहेत.
सुवर्णदुर्ग
किना-यापासून एक मैल पाण्यात असलेला व दोन एकर जागा व्यापून राहिलेला हा किल्ला 1660 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला व त्याची फेरबांधणी केली. काहींच्या मते 16 व्या शतकांत विजापूरकरांनी तो बांधला, तर काहींच्या मते शिलाहार राजवटींपासूनच तेथे दुर्ग होता. परंतु याबाबतच फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्याच्या कालनिश्चितीवर प्रकाश पडत नाही.
अखंड व भक्कम तटबंदी असलेल्या या दुर्गाला सुमारे 15 बुरूज आणि दोन दरवाजे आहेत. किना-सावरून होडीने या किल्ल्यात जावे लागते. वाळूच्या छोटयाशा पुळणीवरूण प्रवेशद्वाराकडे जाता येते. हे प्रवेशद्वार विशिष्ट बांधणीमुळे तटबंदीत लपले आहे. अगदी जाईपर्यंत त्याचा नेमका अंदाज येत नाही. किल्ल्याच्या तटावर मारूती तर पायरीवर कासव कोरलेले आढळते. सर्व किल्लाभर वड आणि बोरीची झाडी मजली आहे. बुरूजांलगत असलेल्या काही खोल्या व दोन कोठारे एवढेच बांधकाम आता शिल्लक आहे. तटाला लागून एक हौद व विहीर आहे. एका वाडयाचे प्रवेशद्वार व काही अवशेष दिसतात. दुसरा चारदरवाजा समुद्राच्या बाजूला आहे. तेथवर उतरण्यासाठी तटामधून जिना बांधलेला आढळतो. मराठी आरमाराच्या पडत्या काळाबरोबरच मराठी सरखेल कान्होजी आंग्रेंच्या देदीप्यमान कारकर्दीचाही हा किल्ला साक्षीदार होता. या किल्याच्या दुय्यम किल्लेदारपदी कान्होजींचे वडील होते. त्यानंतरच याच किल्ल्यावर कान्होजींनी उमेदवारी केली. या काळात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या करकर्दीत सुवर्णदुर्गावर सिद्दींचे आक्रमण झाले असता मुख्य किल्लेदाराची फितूरी कान्होजींनी उघडकीस आणली व त्याचा शिरच्छेद करून किल्ल्याच्या लढयाचे यशस्वी नेतृत्व करून हल्ला परतवून लावला. यामुळे नंतरच्या काळात त्यांना सरखेल ही पदवी देऊन मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.1996 साली सुवर्णदुर्ग कान्होजी आंग्य्रांचे केंद्र होते. येथन त्यांच्या पराक्रमी कारकर्दीची सुरवात झाली. कान्होजींनंतर त्यांचा मुलगा तुळोजी गादीवर आला, पण तो पेशव्यांना जुमानेसा झाला. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळोजीवर हल्ला केला. इंग्रज या संधीची वाटच पाहत होते. दोघांनी मिळून तुळोजीचा सपशेल पराभव केला आहे आणि किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला.
1802 साली यशवंतराव होळकरांच्या हल्ल्यामुळे दुसरा बाजीराव पुणे सोडून काही काळ या सुवर्णदुर्गात आश्रयाला होता. नोव्हेंबर 1818 साली पेशव्यांकडून इंग्रजांनी फारसा संघर्ष न करता तो ब्रिटिश अंमलाखाली आणला. असा सुवर्णदुर्गाचा थोडक्यात इतिहास सांगता येतो. इंग्रजांच्या आगमनाबरोबरच सुवर्णदुर्गाची वैभवशाली कारकर्दी संपुष्टात आली
पाजपांढरी
पाजपांढरी
माशांच्या वाळवणाचा घमघमाट सुरू झाला की पाजपांढरी गाव आल्याचे लगेच लक्षात येते. समुद्रकिना-यालगत रस्त्याच्या कडेला वसलेला हे गाव म्हणजे एक मोठा कोळीवाडाच आहे. गावातील सर्व घरे कोळयांचीच आहेत. रस्त्याच्या कडेला वाळत घातलेली मासे, खुंटीला लावलेली जाळी, लाटेवर डुलणा-या होडया, डोक्यावर टोपली घेऊन जाण-या कोळिणी आणि मुक्तपणे बागडणारी त्यांची मुले हे सगळं कुतूहल वाढविणारं आहे. पोहोचविणा-या सागरपुत्रांचे कष्टमयी जीवन पाहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे.
आंजर्ले - दुर्गादेवी मंदिर
आंजर्ले - दुर्गादेवी मंदिर
आंजर्ले हे गाव पेशवाईतील सरदार शिर्के व खामकर यांनी वसवले आहे. गावातील दुर्गादेवी मंदीरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थोरले बाजीराव पेशवे यांच्या हस्ते इ.स. 1653 मध्ये करण्यात आली. येथे चैत्र महिन्यात देवीचा उत्सव असतो. आंजर्ल्याला 1/1.5 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
आडे - परशुराम मंदिर समूह
आडे - परशुराम मंदिर समूह
आडे गावातून केळशीकडे जाताना उजव्या हाताला दगडी पाय-या बांधलेल्या दिसतात. 10/15 मिनिटांची ही पाय-यांची चढण चढून गेल्यावर आपण पाच मंदिराच्या समूहापाशी पोहोचतो. ही सर्व मंदिरे त्यांच्या बांधकामाच्या धाटणीवरून पेशवेकालीन वाटतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार ही स्थाने पुरातन आहेत. येथे मुख्य मंदिर परशुरामाचे असून त्याच्या उजवीकडे शंकर-रेणूका, डावीकडे मारूती, गणपती आणि वेताळ व शनि अशी मंदिरे आहेत. सर्व मंदिरे पूर्वाभिमूख असून अशा पध्दतीचा मंदिर समूह या भागात पाहायला मिळत नाही. मंदिराच्या डावीकडे दगडी पाय-यांचे पाण्याचे मोठे कुंड आहे. मध्यभागी एक छोटी, खोल पाण्याची विहीर आहे. कोकण किना-यावर दोन ठिकाणीच परशुरामाची मंदिरे आढळतात. त्यातील एक चिपळूण येथे असून दुसरे आडे-पाडले येथे आहे.
आडे गावातून नारळी पोफळीच्या बागांमधून समुद्रकिना-यावर जाता येते. गावाला देखणा समुद्रकिनारा लाभला असून, किना-यालगत केवडयाचे मोठे बन आहे. हंगामाच्या दिवसांत म्हणजे गणपतीच्या सुमारास संपूर्ण किना-यावर केवडयाचा सुगंध पसरलेला असतो.
उटंबर बेलेश्वर मंदीर
उटंबर बेलेश्वर मंदीर
आंजर्ले-आडे या बाजूने केळशीत प्रवेश करताना उटंबर या केळशी गावाच्या वेशीवर उजवीकडे असलेली चढण चढून गेल्यावर आपण बेलेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या चारही बाजूस दगड संरक्षक भिंत आहे. त्यातून आत गेल्यावर हेमाड पंथी पध्दतीचे मंदिर दिसते. हे मूळ मंदिर पुरातन असावे. मूळ मंदिराभोवती लाकडी खांब व कौलारू छप्पर बांधलेले आहे. मंदिरात रेखीव दगडी शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात साडेतीन ते चार फूटाचे दगडी स्तंभ असून त्यावर काही कोरीव काम आहे. ही शुरवीरांची दगडावर कोरलेली स्मारके आहेत. त्याली लंगळ, विरंगळ असे म्हणतात. अतिशय शांत व निसर्गम्य परिसरात असलेल्या या आडवाटेवरच्या बेलेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्यावी.
केळशी
केळशी
आशापूरक सिध्दी विनायक
दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या खाडीलगत ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले केळशी हे गांव वसले आहे. दोन्ही बाजूस पाणी असल्याने हे गाव बेटासारखे झाले आहे. अत्यंत निसर्गसमृध्द व देखण्या समुद्रकिना-याने या गावाचे संदर्य वाढवले आहे.
केळशी गावात परांजपे आळीच्या सुरूवातीस पेशवेकालीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमूना असलेले हे गणपती मंदिर आहे. इथे असलेली सुमारे साडे तीन फूट उंचीची संगमरवरी मुर्तीही उत्कृष्ट शिल्पकलकचा नमुना आहे. यालाच पांढरा गणपती असेही म्हणतात. देवळाच्या डावीकडे एक समाधी मंदिर आहे. तर उजवी कडे काळया दगडातील सुंदर पुष्करणी आहे. संपूर्ण मंदिर परिसाला एखाद्या किल्याप्रमाणे 8-1 फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. आतील बाजूस भिंतीत दिवे लावण्यासाठी सर्वत्र कोनाडे आहेत. येथे माघातील गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा होतो.
महालक्ष्मी मंदीर
गावाच्या दक्षिण टोकाला असणा-या उंटबर डोंगराच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंदीर आहे. मंदिर उत्तराभिमूख असून बांधकाम पेशवाई काळातील आहे. मंदिरापुढे धर्मशाळा बांधली असून त्यात गणपती शंकराची पिंडी आहे. मंदिर परिसरात एक विहीर तसेच एक तळे असून त्याला बांधीव पाय-या आहेत. त्यात अनेक कमळे उमललेली असतात. मुख्य प्रवेशद्वारापाशी सनई चौघडा वादनासाठी नगार खाना बांधला असून संपूर्ण मंदिराला 8-10 फूट उंचीची तगडी तटबंदी बांधलेली आढळते. या देवळाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान आहे व दुस-या घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत.मागील बाजूस असणा-या उंटबर डोंगराच्या घनदाट झाडीच्या पार्श्वभूमीवर हे मंदीर सुरेख दिसते. येथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा मोठा उत्सव असतो. हा उत्सव म्ाहाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या खेरीज नवरात्र उत्सव ही साजरा केला जातो. या वेळीस गोंधळ किर्तने रथ यात्रा असे कार्यक्रम असतात. व संपूर्ण गाव जातीभेद विसरून यात सहभागी होते. कोकणातील भावीकाने कोल्हापूरच्या अंबाबाईला बोललेला नवस येथे जाऊन फेडणे शक्य नसेल तर या महालक्ष्मी मंदीरात तो फेडला तरी चालतो. असे येथील महात्म्य आहे.
याकूब बाबा दर्गा
महालक्ष्मी मंदिराच्या उजवीकडून डोंगरावर जाणा-या रस्त्याने 1 किमी.अंतरावर हा इतिहास प्रसिध्द दर्गा आहे. हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्ला दर्गा असे याचे नाव असून हा सुमारे 386 वर्षापूर्वीचा आहे. 1618 मध्ये हैद्राबाद सिंधप्रांतातून याकूब बाबा बानकोट मार्गे केळशीत पाहोचले. त्यांच्या बरोबर सहुलत खान हा 10 वर्षांचा मुलगा होता. हिरजी गोरजी नावाच्या गुजर व्यापा-याने त्यांना होडीतून केळशीत येण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्याला हे कोणी अवलिया संत आहेत हे जाणवले होते. तेव्हा पासून याकूब बाबा यांचे केळशीत वास्तव्या होते व त्यानी तेथे अनेक चमत्कार केले. काही ठिकाणी याकूब चा उल्लेख याकूत असाही करतात.
छत्रपती शिवाजी महारांची दाभोळ स्वारीची तसारी चालू असताना त्यांची व याकूब बाबांची भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वारी न करण्याचा सल्ला दिला. परंतु तयारी पूर्ण झाली असणारी तो न मानता महाराजांनी दाभोळवर चढाई केली. त्या वेळीराजांचे सर्व आरमार वादळात सापडले व परिणामत: मोहिम अर्धवट सोडून द्यावी लागली. दिलेल्या सल्ल्याच्या आठवण होऊन महाराज पुन्हा याकूब बाबांना भेटले. त्या वेळेस बाबांनी दाभोळवर हल्ला करण्याची तारीख शिवाजी महारांना सांगितली. व त्या दिवशी चढाई केल्यावर महाराजांना मोठे यश आले. महाराज पुन्हा येऊन बाबांना भेटले व त्यांनाआपले गुरू मानले. महाराजांनी त्या ठिकाणी दर्गा बांधण्याची ईच्छा व्यक्त केली. त्या्प्रमाणे दगडी चौथरा व त्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पध्दतीच्या कमानी बांधल्या गेल्या. व दर्ग्याच्या खर्चासाठी 534 एकर जमिन इनाम दिली. पुढे महारांजाचे निधन झाले. व संभाजी महारांजी दर्ग्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते होऊ शकले नाही. काहीजण असे मानतात की याकूब बाबांना स्वत:च्या डोक्यावर छप्पर नको होते. या त्यांच्या इच्छेमुळेच बांधकाम अर्धवट राहिले. या ठिकाणी स्वत: शिवाजी महाराज दोन-तीनदा संभाजी महाराज 2 वेळा, व थोरले बाजीराव एकदा येऊन गेल्याचे नोंद इतिहासात आढळते.
1681 साली याकूब बाबांचे देहावसान झाले. 6 डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस होतो. उरूसाची सुरूवात करण्याचा मान एका हिंदू माणसाला असतो. हजारोच्या संख्येने मुसलमान व हिंदू भक्त या दर्ग्यावर येतात. 20 व्या शतकातील 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर हा तारखेचा योगायोग निश्चित काही संदेश देऊन जातो. हिंदूचे श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मुसलमान गुरू आणि दर्ग्याच्या उरूसाची सुरूवात एका हिंदू माणसाकडून या गोष्टी जातीपेक्षा माणूस धर्मच श्रेष्ठ आहे असे ठासून सांगतात. येथून जवळच समुद्राच्या बाजूला धोकार शेख दर्गा आहे.
वाळूचा डोंगर
आपल्याला फार क्वचित पाहायला मिळेल असा समुद्राच्या मऊशार वाळूचा डोंगर (टेकडी) या किना-यावर पाहायला मिळतो. या वाळूच्या डोंगराखाली पुरातन संस्कृतीचे काही पुरावे असल्याची माहिती अलिकडेच उजेडात आली आहे. त्याबाबत तज्ञांचे शोध संशोधन कार्य चालू आहे.
खडप
केळशीला सुमारे 3 किमी. लांबीचा रूपेरी वाळूचा समुद्र किनारा आहे. सुरू, केवडयाची वने, नारळी सुपारीच्या गर्द झाडीच्या सान्निध्यात सागर लाटांचे संगीत अनुभवाया मिळते. हा समुद्रकिनारा पोहण्यास धोकादायक नाही. परंतु स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन मगच पाण्यात उतरावे. समुद्रकिना-याच्या खडकाळ भागास स्थानिक भाषेत खडप म्हणतात. समुद्रात जेथे उटंबरचा डोंगर घुसला आहे. त्या ठिकाणी खूप मोठे मोठे काहे पत्थर आहेत. सागरसंपत्ती मिळण्याचे केळशीतील हे एकमेव ठिकाण. शंख-शिंपले, कवडया, समुद्रफेणी, निरनिराळया आकारांची समुद्र प्राण्यांची घरे इ. सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. येथून आपल्याला हर्णे येथील सुवर्णदुर्गही दिसतो
वेळास
वेळास
विंडस्कूप
केळशी किंवा बाणकोटहून वेहासला जाणारा रस्ता समुद्रालगत जातो. त्यावेळी उजव्या हाताला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा डोंगर दिसतो तो हरिहरेश्वरचा डोंगर.
वेळास गावात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला डोंगराचे उभे कापल्यासारखे कडे दिसतात. यामध्ये स्कूपने आईस्क्रीम काढल्यानंतर जसा खळगा दिसतो. तसे खळगे खडकांत दिसतात.समुद्रावरील वा-यामुळे खडकांची झीज होते. त्यामुळे हे गोलोकार खळगे पडतात. त्यांना विंडस्कूपिंग म्हणतात. हे निसर्गवैशिष्टय आवर्जून पाहावे.
महादेव, कालभैरव, दुर्गादेवी मंदिरे
नारळ-सुपारी-आंबा यांच्या गर्द झाडीत वेळास हे गाव हरवले आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक, नाना फडणीस यांचे हे गाव, बाणकोट पासून पाच किमी.वर आहे. गावात प्रवेश करातानाच उंच दगडी जोत्यावर नाना फडणीस यांचे गाव, बाणकोट पासून पाच किमी. वर आहे. गावात प्रवेश करतानाच उंच दगडी जोत्यावर नाना फडणवीसांना जीर्णेध्दार केलेली महादेव व कालभैरव अशी दोन मंदिरे दिसतात. दोन्ही मंदीरांची बांधणी पेशवाई पध्दतीची असून , मागच्या बाजूस असलेल्या टेकडीवरील गर्द झाडीमुळे ही मंदीरे उठून दिसतात. रस्त्यापासून वर चढून जाण्यास मोठया दगडी पाय-या आहेत. उजवीकडे पाण्याचा दगडी हौद असून त्यात मंदिरामागून येणा-या झ-याचे पाणी साठवले जाते. दगडी जोत्यावर चढून गेल्यावर समोर दचिणाभिमुख कालभैरव मंदिर आहे. उजवीकडे दोन दीपमाळा आहेत. तर डावीकडे पूर्वाभिमूख महादेवाचेमंदिर असून शिवलिंग सुमारे 4 फूट लांबीचे आहे. या शिवाय गावात दुर्गामातेचे मंदिर असून चैत्र शुध्द षष्ठीला तेथे मोठी यात्रा भरते.
नाना फडणवासींचा पुतळा
गावातील मुख्य रस्त्याने सरळ पुढे गेल्यास डावीकडे नाना फडणवासांच्या वाडयाचे दगडी जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी दगडी चौथरा उभारून त्यावर छोटयाशा घुमटीत नाना फडणवीसांचा अर्धपुतळा बसवलेला आहे..
वेळासच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिना-यावर थंडीच्याप शेवटी अन उन्हाळयात अजस्र ऑलीव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवांची वीण होते. आजही दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयांची हत्या जिभिचे चोचले पुरविण्यासाठी केली जाते. या कासवांच्या सुरक्षिततेसाठी अनेक निसर्गप्रेमी संस्था कार्यरत आहेत
बाणकोट
बाणकोट
हिंमतगड
रत्नागिरी जिल्हयातील उत्तरेकडचे शेवटचे टोक म्हणजे बाणकोट.
प्लिनी या ग्रीक तज्ज्ञांने मंदगोर किंवा मंदारगिरी या नावाने इसवी सनाच्या पहिल्या शतकात बाणकोटचा उल्लेख केला आहे. येथे सावित्री नदीच्या दक्षीण तीरावर खाडीच्या मुखाशी टेकडीवर बाणकोटचा किल्ला आहे. विजापूरकरांपासून 1548 मध्ये हा किल्ला पोर्तुगिजांकडे व नंतर 16 व्या शतकाच्या मध्यात मराठयांकडे आला. ब्रिटीशांच्या काळातही जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व खाडीचे महत्त्व होते. मराठयांच्या ताब्यात असलेला हा हिंमतगड कमोडोर जेम्स याने जिंकला आणि त्याला फोर्ट व्हिक्टोरीया असे नाव दिले.
किल्लयावर जायच्या चढणीच्या रस्त्यावरच बाणकोट गाव लागते. या गावात चहा-पाणी/नाष्टा याची सोय नाही. गावात फक्त एक विहीर आहे. त्यामुळे हा सर्व बंदाबस्त करून मग किल्ल्यात जावे लागते.
बाणकोट गावातून थेट किल्ल्यांपर्यंत जाणारा डांबरीमोटार रस्ता आहे. किल्ल्याजवळ पोहोचण्या-या जमिनीच्या बाजूला तटबंदीलगत खंदक खणलेला आहे. परंतु काही ठिकाणी दगड-धोंडे, माती, झाडेझुडपे यांनी तो आता बुजला आहे. साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्याचे पश्चिम दिशेस समुद्राच्या बाजूला उत्तराभिमुख्स प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. नदीच्या पलीकडच्या तीरावर छोटयाशा सुरूच्या बनामागे दिसणारा महादेवाच्या पिंडीच्या बाकाराचा डोंगर म्हणजे हरितेश्र्वर. बाणकोटच्या अलीकडे वेशवी नावाचे गाव आहे. या गावातही एक 500 वर्षे जुनी मशीद असून ती अजूनही वापरात आहे. परंतु तेथे आत प्रवेश मिळत नाही. तेथून लाँचने बागमांडले किंवा कोलमांडले येथे जाता येते. येथून हरिहरेश्र्वर फक्त 4 कि.मी. अंतरावर आहे.
प्रवेशद्वारातून आत शिरले की ज्या उजव्या व डाव्या बाजूस पहारेक-यांच्या खोल्या आहेत. पुढे गेल्यावर नगारखान्यावर जाण्यासाठी डाव्या हाताला दगडी जिना आहे. उजव्या कोप-यात एक भूयार व तळघर आहे. या शिवाय तटावर जाण्यासाठी दोन जिने आहेत. आतील इमारतींची फक्त जोतीचे शिल्लक आहेत. आतमध्ये आंबा आणि इतर मोठमोठी झाडे आहेत.
दक्षिणेकडील बुरूजातून बाहेर पडण्यासाठी एक दिंडी म्हणजे छोटा दरवाजा बाहे. त्यातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला उतारावर खालच्या बाजूस दिसणारी स्मारके म्हणजे त्यावेळची ब्रिटिश दफनभूमी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर पाणबुरूज दिसतो.
सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा जागी असलेल्या ह्या किल्ल्यावरून हर्णे-मुरूडपासून हरिहरेश्र्वर-श्रीवर्धनपर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. हर्णे-बंदरातील मच्छीमार बोटी, खोल समुद्रात क्वचित अतिप्रचंड जहाजेही दृष्टीस पडतात.
इ.स. 1800 च्या सुमारास मुंबईहून समुद्रमार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी बाणकोट व तेथून सावित्री नदीच्या खाडीतून जावे लागे. या मार्गाने आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्र्वरला जायला निघाला. त्यावेळी त्याची 25 वर्षांची पत्नी सोफीया व अवघ्या 32 दिवसांची मुलगी एलेन व्हॅरिएट यांना घेऊन जाणारी बोट 13 खलांशांसह बाणकोट खाडीत बुडाली. याच किल्ल्याच्या दफनभूमित त्यांचे स्मारक, मॅलेट मेमोरियल आजही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथे दगडी चौथरा व त्यावर दगडी स्तंभ उभारलेला असून त्यावर त्यांची नावे कोरलेली होती.
या दु:खद प्रसंगानंतर महाबळेश्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमापाशी उंच कडयावर जाऊन, आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुस-या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत या भावनेने एकांती बसत असे. तोच आजचा महाबळेश्वरचा सुप्रसिध्द पाँईंट आर्थर सीट.
पाणबुरूज
बाणकोट किल्ल्यावरून खाली उतरून मुख्य रस्त्याला लागल्यांनतर वेळासकडे जाताना उजव्या हाताला एक छोट बुरूजासारखे पडके बांधकाम दिसते. याला बुरूज म्हणतात. पूर्वीच्या काळी येणारे मचवे, पडाव, होडया येथेच लागत असत
दापोली
दापोली
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिविद्यापीठ
दापोलीच्या मुख्य रस्त्यावरून हर्णे-मुरूडकडे हर्णे-मुरूडकडे जाताना बुरोंडी पोलिस नाक्यापाशी डावीकडे वळून पाच मिनिटात आपण कोकण कृषिविद्यापिठाच्या भव्य कमानीच्या प्रवेशद्वरापाशी पाहोचतो. सरळ रस्त्याने आत गेल्यावर उजवीकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाची इमारत आहे.
कोकण भागातील कृषिशिक्षण, संशोधन व विस्तारशिक्षण यासाठी 18 मे, 1972 रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्हयांचा कार्यक्षेत्रासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिविद्यापिठाची स्थापना दापोली येथे करण्यात आली. विद्यापीठातील प्रामुख्याने कृषिविद्याशाखा, कृषिअभियांत्रिकी, मत्स्यविद्याशाखा या तीन शाखा असून विविध विषयांवर अनेक संशोधन प्रकल्प व कृषितंत्रज्ञान प्रकल्प कार्यान्वित आहेत. फलोत्पादन हे कोकणचे अत्यंत महत्वाचे वैशिष्टये आहे.हे लक्षात घेऊन विद्यापिठाने आंब्याच्या रत्ना, सिंधू व कोकण रूची या महत्त्वपूर्ण जाती विकसित केल्या आहेत. तसेच काजू, कोकम, नारळ, चिकू, करवंद यांबरोबरच कंदपिके, जायफळ, काळीमिरी, दालचिनी, लवंग यांसारख्या मसाला पिकांच्या निरनिराळया जाती व त्यांच्या लागवड व वृध्दीसाठीच्या पध्दती विकसित केल्या आहेत.
याशिवाय भात, नागली, चवळी, कुळीथ, वाल, भाजीपाला पिके , वनशेती, चरक वनौषधी संग्रह यावर संशोधन व नवनवीन जातींची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. कोकणातील भूप्रदेश व शेतीपध्दतीचा विचार करून उपयुक्त ठरतील अशी अनेक शेती अवजारेही विद्यापिठाने विकसित केली आहेत. ती शेतक-यांना वरदानच ठरली आहेत. फळे आणि भाजीपाला यांच्या काढणीनंतरचे व्यवस्थापन व प्रक्रिया यावर विशेष याेजना कार्यान्वित आहे.
मत्स्यशेतीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील एकमेव मत्स्यमाविद्यालय शिरगांव, ता. जि. रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आले आहे. तसेच मत्स्य संशोधन-केंद्रे मुंबई व रत्नागिरी येथे स्थापन केले आहे.
विद्यापीठाचे शिक्षण व संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार शिक्ष्ण संचालनालय स्थापन केले असून कृषी, अभियांत्रिकी आणि मत्स्य या तीनही विद्याशाखांद्वारे हे प्रसारकार्य चालते. यात शेतकरी प्रशिक्षण वर्ग, मेळावे, प्रदर्शन, सहली, प्रात्यक्षिके, गटचर्चा, माहितीपट अशा विविध मोहिमांद्वारे सुधारीत कृषितंत्रज्ञान व संशोधनाचे फायदे शेतक-यांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवले जातात.
भारतीय कृषिअनुसंधान परिषद, नवी दिल्लीतर्फे दिला जाणारा 1997 चा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार विद्यापीठाच्या एकूण कार्यासाठी मिळाला आहे. अशा या
विद्यापिठाला भेट देणे हा एक वेगळाच अनुभव ठरतो. कॉन्क्रीटच्या जंगलात राहणा-या आणि प्रदुषणाच्या विळख्यात दैनंदिन जीवन जगणा-या शहरवासीयांना या सुजलाम सुफलाम् वातावरणाचा मोह पडतो. आवर्जून जाऊन संशोधन व उपक्रमांची माहिती घ्यावी असे हे ठिकाण आहे.
बुरांडी नाक्याच्या अलीकडे असलेल्या माहीती केंद्रात जाऊन तेथील कायमस्वरूपी कृषिदर्शन पाहाता येते व तेथेच विद्यापिठाची माहिती पत्रकेही मिळतात. पूर्वपरवानगीने विद्यापीठ परिसरही पाहाता येतो.
सेंट अॅन्ड्रयुज चर्च
दापोली-हर्णे रस्त्यावर केळसकर नाक्याजवळ डावीकडे एक भव्य, दगडी परंतु भग्न इमारत दिसते. त्यावर व भोवती झाडी माजलेली आहे. हेच दापोलीतील सर्वांत जुने सेंट अॅन्ड्रयुज चर्च. 1810 सालच्या सुमारास बांधून पूर्ण झालेले हे चर्च गॉथिक रोमन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे चर्च इंग्लंडमधील एका प्रसिध्द चर्चची प्रतिकृती आहे. ब्रिटीशांच्या लष्करी ठाण्यातील अनेक अधिकारी व सैनिक यांच्या प्रार्थना व इतर धार्मिक गरजा भागवण्याच्या दृष्टीने या चर्चची उभारणी झाली होती. चचच्या बेल टॉवरमध्ये पूर्वी 6 फूट उंचीची घंटा होती. तिचा आवाज त्या वेळी खूप लांबवरच्या परिसरात ऐकू जात असे. 1938-39 च्या सुमारास या चर्चमधील प्रार्थना तत्कालिन परिस्थितीमुळे थांबली. त्यानंतर आजपर्यंत ती वस्तू अत्यंत दुर्लक्षित राहिले. त्यामधील अनेक चीजवस्तू हळूहळू चोरीस गेल्या. 6 फुटी घंटा हुबळी येथील चर्चमध्ये हलवली आहे. एकेकाळची ही धार्मिक ऐतिहासिक वास्तू आज मात्र भयाण अवस्थेत एकाकी आहे.
गणपती मंदिर
दापोली शहरापासून तीन किमी. वर असलेल्या ब्राह्मणवाडीत डांबरी सडकेपासून उजव्या हाताला कच्च्या रस्त्याने गेल्यावर गणपतीचे जागृत देवस्थान आहे. शिवपूर्वकसलीत याची निर्मिती झाली असे सांगितले जाते. सभामंडक, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या बाजूला असलेली विहीर. त्यालीच पुष्करणीही म्हणतात.
मंदिरासमोरील तलाव मराठा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सैन्य व घोडे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधल्याची माहिती मिळते. त्यांच्या सैन्याच्या जागेवरून त्या भागाला लष्करवाडी असे नाव पडले. या तलावात असंख्य मनमोहक कमळें उमललेली असतात.
जागृत असे हे स्थान असून नवसाला पावणारा देव अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. गणपतीची मूर्ती दीड-दोन फूट उंचीची असून ऑईलपेन्टने रंगविल्यामुळे तिचे मूळ रूप दिसू शकत नाही. मंदिराच्या गाभा-यात अता संगमरवर लावला आहे. शेजारीच शंकराचे मंदिर असून त्यासमोर दीपमाळ आहे.
हे गणपती मेदिर असले तरी येथे नृसिंहजन्मोत्सव साजरा केला जातो. त्याला सव्वाशे-दीडशे वर्षांची परंपरा आहे. त्याकाळी ब्राह्मणवाडीत दोन उत्कृष्ट वेदपाठशाला होत्या.
दूरदूरच्या गावांतून येणा-या काही विद्यार्थ्यांच्या गावी नृसिंहजन्मोत्सव साजरा हात असे. त्यासाठी जाऊन येण्यास महिना-दोन महिने अध्ययनात खंड पाडून जावे लागे. म्हणून तो उत्सव या मंदिरात करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. या मंदिराला नृसिंहाचे मंदिर हेही नाव यामुळेच पडले. शंकराच्या मंदिराशेजारी वेदाध्ययनातील एका अधिकारी व्यक्तीची समाधी आहे.
मंदिर परिसरात वड, पिंपळ, आंबा, चंदन अशी झाडे असून सभोवताली वा-यावर डुलणारी शेती, कोणत्याही मोसमात असलेले आल्हाददायक वातावरण यामुळे वनभोजनाचा कार्यक्रम येथे करण्याचा मोह टाळता येत नाही.
याशिवाय दापोली-दाभोळी रस्त्यावर जालगावातच श्री लक्ष्मीनारायणाचे प्राचीन दगडी मंदीर आहे. येथे रामनवमीचा उत्सव मोठया प्रमाणावर होतो. त्या वेळी लाकडी स्थरावरून भालदार-चोपदारांसह निघणरी मिरवणूक प्रेक्षणीय असते
वळणे - केशवसुतांचे घर, केवडयाचे बन
वळणे - केशवसुतांचे घर, केवडयाचे बन
दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून तीन किमी. वर निगडे फाटयापाशी डावीकडे वळून आतमध्ये 3 किमी. वर वळणे हे गाव आहे. जालगावातील ब्राह्मणवाडीतूनही तेथे जाता येते. परंतु तेथून काही अंतर पायी उतरावे लागते. मराठी साहित्यातील प्रसिध्द कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांच्या काव्यप्रतिभेची सुरूवात याच वळणे या गावातून झाली. त्यांचे जन्मगाव रत्नागिरी जवळ मालगुंड असले तरी वळणे गावी त्यांचे काही काळ वास्तव्य होते. शांत वाहणारी नदी आणि काजू, आंबा, माड, साग, अशा विविध झाडांनी नटलेला आजूबाजूचा रम्य परिसर, केवडयाचे बन अशा सुंदर सुगंधी वातावरणाचा परिणाम होऊन त्यांच्यातील काव्यप्रतिभा जागृत झाली. त्यांचे वास्तव्य असलेले घर आजही पाहावयास मिळते. परंतु ते अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बाहे. तेथे त्यांचे स्मारक उभारण्यचा प्रस्ताव विचारधिन आहे असे स्थानिक लोकांकडून समजते.
थोडेशा आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या कुशीतील या चिमुकल्या गावाला आवश्य भेट द्यावी. सुगंधी केवडयाचा हिरवाकंच खोपा घालून झुळझूळ वाहणारी नदी, केवडयाचे घनदाट बन आणि त्यात मुक्त विहार करणारे मोर या सगळया आठवणी मोरपिसासारख्याच जपून ठेवाव्यात अशा आहेत.
क्वचित प्रसंगी केवडयाच्या बनात आपल्या चाहुलीने सावध होऊन आपल्या समोरून सळसळत बिळात जाणारे 8-10 फुटी साप/नाग दिसू शकतात. ते दर्शन निस्तब्ध करणारे आणि खूपच थरारक असते.
टाळसुरे
टाळसुरे
दापोली-खेड रस्त्यावर दापोलीपासून 5 किमी. अंतरावर टाळसुरे येथे डॉ. मोकल बागेशकजारी दोन छोटे दगडी घुमट दिसतात. या घुमटयांमध्ये सडवे व शेडवई येथील मुर्तींसारखीच तिसरी परंतू भग्न अशी विष्णूची प्राचीन मुर्ती अंधा-या गाभा-यात आढळते. मूर्ती पूजेत नसल्यामुळे गाभा-यातच एका बाजूला ठेवली आहे. या परिसरात दुर्गादेवी, महादेव, मानाई अशी मंदीरे, मानाई मंदीरामध्ये काळभैरव व इतर ग्रामदैवतांच्या छोटया दगडी मूर्ती आहेत. त्यापैकी एका मर्तीला दहा तोंडे दाखविली आहेत. या मूर्तिबाबत नेमकी माहिती मिळत नाही, परंतु दहा तोंडे असल्यामुळे ती उत्सुकता कायम आहे.
मंदीराच्या पाठीमागे खळाळता ओढा असून योग्य ती सुरक्षितता पाळून त्यात मनमुराद पोहता येते. या ठिकाणीचा मोकल बाग परिसरही पाहण्यासारखा असून या बागेत खाण्यात वापरला जाणारा व्हॅनिला इसेन्स ज्यापासून मिळवतात अशी रोपेही पाहायला मिळतात.
शिर्दे - भोमेश्वर मंदिर
शिर्दे - भोमेश्वर मंदिर
दापोली-जालगाव-ब्राह्मणआळीतून सडवे गावाकडे जाताना डाव्या हाताला एक चढणिचा रस्ता फुटतो. या रस्त्यावरून दोन किमी. अंतरावर डोंगरावरून रस्त्याने खाली उतरून आपण शिर्दे या छोटेखानी गावात पोहोचते गावात ओढयाच्या काठी अलीकडेच जीर्णोध्दार केलेले भोमेश्वर मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर प्राचीन अथवा पुरातन नसले तरी या मंदिरात असलेले सुमारे 4 फूट उंचीचे वारूळ हे येथील वैशिष्टय आहे. या वारूळालाच देव मानून मंदिर बांधलेले असून त्याशेजारी महादेवाच्या पिंडाची स्थापना नंतर केलेली आहे. गाभा-यातच जाख्ख्याय, काळकाय आदी ग्रामदेवतांच्या दगडी कोरीव मूर्ती आहेत.
मंदिराच्या मागे उघडयावरच एका सुंदर दगडी मूर्तीचे भाग्रावशेष दिसतात. या मूर्तीचे हात,पाय आणि शिर तुटलेले असले तरी त्यावरील कोरीव काम व कलाकुसर आवर्जून पाहण्यासारखी आहे. विष्णूची ही मूर्ती प्राचीन असून, येथून जवळ असलेल्या सडवे गावाच्या विष्णू मूर्तीच्या धाटणीशी तिचे साधर्म्य आहे. साधारणपणे एकाच कालखंडातील या काळया पाषाणाच्या मूर्ती सुमारे 800 वर्षांपूर्वीच्या असल्याचे अनुमान निघते. सुंदर नक्षीकाम असलेली प्रभावळ आणि अलंकारिक अशा या मूर्तीची काहीच माहिती उपलब्ध नाही. डोंगर उतारावरच्या गावातील हे शिल्प आवर्जून पाहण्यासारचे आहे.
सडवे - विष्णूमंदिर
सडवे - विष्णूमंदिर
शिर्दे गावातून मुख्य रस्त्यावर येऊन त्याच मार्गाने पुढे सडवली, कोळबांद्रे मार्गे सडवे किंवा दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळे मार्गेही थेट डांबरी सडकेने सडवे गावात जाता येते. गावातच मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीच्या शाळेसमोरच्या कच्च्या रस्त्याने खाली उतरावे. खालच्या बाजूस ओढयाच्या काठी गर्द झाडीत विष्णुमंदिर दिसते. मंदिराच्या चारीबाजूंनी दगडी तट असून त्यात दोन प्रवेशद्वारे आहेत. आता मूळ मंदिराच्या जागी नवीन मंदिर उभारले गेले आहे. येथे जांभ्या दगडातील दीपमाळही आहे.
येथील श्री विष्णूची सुमारे चार फूट उंचीची काळया पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. सालकृंत अशा या मूर्तीवरील कोरीव नक्षीकाम पाहाण्यासारखे आहे. प्रभावळीवरही नक्षीकाम असून त्यावर दशवतार कोरलेले आहेत. शेजारी एक फूट उंचीच्या गरूडाची दगड मूर्ती आहे. मूर्तीच्या पाययाशी आडव्या पट्टयावर देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेतील एक शिलालेख कोरलेला आहे. तो मूळ मजकूर स्पष्टपणे वाचता येतो. त्याचा अर्थ विष्णूची मूर्ती सुवर्णकार (मूर्तीकार) कामदेवाने केली. उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत यांचा प्रधान देवूगीनायक याने शके 1127 (इ.स.1205) सोमवार, रोहिणी नक्षत्र या दिवशी मूर्तीची स्थापना केली. कुतूहल म्हणून आपण तो देवनागरी लिपीतील मूळ मजकूर वाचण्याचा प्रयत्न करावा. चार-दोन अक्षरे जरी लागली तरी एक वेगळाच आनंद मिळतो.
कला व शिल्पप्रेमींनी थोड्याशा आडबाजूला असलेले हे 800 वर्षांपूर्वीचे देखणे शिल्प आवर्जून पाहावे. प्रत्यक्ष मूर्तीच्या दर्शनाने केलेल्या श्रमांचे सार्थक होते.
उन्हवरे - गरम पाण्याचे झरे
उन्हवरे - गरम पाण्याचे झरे
दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळे मार्गे घाटरस्त्याने आपण थेट उन्हवरे गावात पोहोचतो. घाटमाथ्यावरून खो-यातील हिरवेगार डोंगर, त्यामधून वाहणारी नदी, वा-यावर डुलणारी शेती आणि हा साज लेवून डोंगरउतारावर विसावलेल्या वाडया-वस्त्या पाहून नकळत आपण तिकडे खेचले जातो.
नदीकाठी वसलेल्या उन्हवरे गावचे वैशिष्टय म्हणजे येथे असलेले गरम पाण्याचे झरे. जमिनीखालून बाहेर येणारे हे उकळते पाणी तीन कुंडात साठवले आहे. गंधकयुक्त अशा या पाण्यामध्ये त्वचारोग बरे करण्याचे गुणधर्म आहेत. यासाठी तेथे स्नानगृहेही बांधली आहेत. मूळ झ-याच्या ठिकाणी जमिनीतून अक्षरश: उकळते पाणी बाहेर पडते. त्या स्वच्छ, नितळ पाण्यातील बुडबुडेही स्पष्ट दिसतात. या गरम पाण्यामुळे आसपासची जमिनही पायाला गरम लागते. हा मूळ झरा भाविकांचे श्रध्दा स्थान झाले असून, अनवाणी पायांनी तेथे जावे लागते. सभोवतालचा परिसर, खाडी समोरच्या डोंगरावरील महादेव मंदिर, मदरसा, घनदाट झाडी असे दृष्टिसुख घेत हे निसर्गवैशिष्टय स्पर्श करून आवर्जून अनुभवण्यासारखे आहे.
या नदीवर पूलाचे काम चालू असून, येथून थेट चिपळूण तालुक्यातील गुहागरपर्यंतचा रस्ता होत आहे. गावात चहा-नाष्ट्याची किरकोळ सोय आहे. खास निवासाची सोय नाही.
पन्हाळेकाजी - लेणी
पन्हाळेकाजी - लेणी
दापोली-दाभोळ रस्त्यावर सुमारे पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. गावापर्यंत थेट गाडी जाते. तेथे कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात. इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी यामुळे हा परिसर अत्यंत रम्य दिसतो. यातील 28 गुहा उत्तराभिमुख असून 29 वे लेणे थोडे पुढे असलेल्या मठवली येथे असून ते गौरलेणे या नावाने ओळखले जाते. हीनयान बौध्द पंथ, तांत्रिक वज्रयान पंथ आणि नाथ पंथातील प्रतिमांबरोबरच गणपती, लक्ष्मी, सरस्वती, शिवलिंग इ. देवतांच्या मूर्तीही आढळतात. हे येथील वैशिष्टय आहे. हा लेणीसमुह खोदण्याची सुरूवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्यावेळी हीनयान बौध्द नंथ अस्तित्वात होता. त्यापुढील काळात म्हणजे सुमारे 8 व्या ते 11 व्या शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या लेण्यात तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व होते. याचा पुरावा सापडतो. याच काळात काही मुळाच्या हीनयान लेण्यांत तांत्रिक पूजाविधीसाठी उपयुक्त असे फेरफार केले गेले. तसेच काही नवीन तांत्रिक देवतांची स्थापना करण्यात आली. 11 व्या शतकानंतर शिलाहार राजा अपरादित्य (इ.स.1127 ते 1148) याने कदम्बांकडून या परिसरातील राज्या मिळवले व आपला पुत्र विक्रमादित्य याला दक्षिण कोकण प्रांतांचा अधिपती बनविले. येथील डोंगरावर प्रणालक दुर्ग नावाचा किल्ला होता. या ठिकाणी विक्रमादित्यांची राजधानी होती. त्याचे अवशेष, खुणा आजही दिसतात.
ही प्राचीन लेणी 1970 च्या सुमारास उजेडात आली. त्याचे श्रेय दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगावकरांना जाते. त्यांना पन्हाळेकाजी गावात एक प्राचीन ताम्रपट सापडला. त्याचे वाचन करून घेऊन त्या अनुषंगाने अनेकांच्या सहकार्याने त्यांनी हे स्थान शोधून काढले. हे ठिकाण आता पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असून तेथे एक रक्षकही नेमलेला आहे. तथापि लेण्यांचा इतिहास, माहिती सांगणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. या ठिकाणी दिलेली साधारण माहिती डॉ. एन.एम.देशपांडे यांच्या लेखातील संदर्भाने दिली आहे.
या लेणी समूहातील 4-5-6-7-8-9 क्रमांकाच्या गुहा मिळून जो गट तयार होतो. तो सर्वांत जुना म्हणजे हीनयान बौध्द नंथीय लेणीसमूह होय. त्याच्या पूर्वेस 1-2-3 व पश्चिमेस 10-11-12-13 हे वज्रयान पंथीय तर 14 व्या लेण्यात नाथपंथीय शिल्प, भिंतीवर नाथसिध्दांची शिल्पे कोरली आहे. 15 क्रमांकाचे लेणे मूळ वज्रयान व नंतर गाणपत्यपूजन यासाठी वापरले असावे असे वाटते. तेथे 5 फूट उंचीचे गणपतीचे शिल्प दगडात कोरलेले आहे. अक्षोप्याची, ध्यानस्थ बुध्द अशा प्रतिमा अनेक लेण्यांमध्ये आहेत. यामध्ये शिवलिंग, छतावर कमळाचे अलंकरण, बाजूच्या भिंतीवर रामायण, महाभारत, कृष्णलीला इत्यादी प्रसंगाची शिल्पे आहेत. याशिवाय इतर लेण्यांमध्ये विशेष कोरीवकाम आढळत नाही.
पन्हाळेकाजी गावात चहा-नाष्ट्याची माफक सोय आहे. संपूर्ण लेणी नीट पाहण्यास दीड-दोन तास तरी हवेत. अतिशय शांत, रमणीय असे हे प्राचीन स्थान आपल्या गत हजार वर्षांच्या कला-संस्कृतीच्या, खुणांनी साद घालत आहे.
चिखलगाव - लोकमान्य टिळक मंदिर, श्री लक्ष्मीकेशव मंदिर
चिखलगाव - लोकमान्य टिळक मंदिर, श्री लक्ष्मीकेशव मंदिर
चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गांव. शालेय पुस्तकांतून त्याचा चिखली असा उल्लेख आपण वाचला आहे. ऐन गावात लो. टिळकांच्या मूळ घराक्ष्श जोत्यावर टिळक मंदिराची देखणी वास्तू उभी आहे. त्यामध्ये त्यांचा अर्धपुतळा स्थापन केला आहे.
टिळक मंडळींचे कुलदैवत श्री लक्ष्मीकेशव हे मंदिर गावाबाहेर ओढयाकाठी दाट झाडीत आहे. त्याला कळसा ऐवजी घुमट व त्याच्या अग्रभागी कमळ आहे. सभागूहाची मात्र पडझड झालेली आहे. मूर्तीजवळ पुरातन पध्दतीची दगडी समई असून देवळासमोर दीपमाळ आहे. सुमारे सव्वादोन फूट उंचीची ही मूर्ती लक्ष्मीकेशवाची मानली तरी ती विष्णूची असावी असे तज्ञांचे मत आहे. पायांत तोडे, गळयात कौस्तुभमाला, छातीवर पादचिन्ह आणि करंडक मुकुट ही वैशिष्टय विष्णूचीच आहेत, असे मानतात.
आवर्जून जावे अशा या गावात सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा आणि रेणू दांडेकर यांनी मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. लो. टिळक हायस्कूल, तांत्रिक शिक्षण देणारे कोर्सेस, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, ग्रंथालय, संस्कार केंद्रे, आरोग्य सेवा असे प्रकल्प येथे राबविले जातात. आजूबाजूच्या खेडयापाडयांतून आणि इतरही अनेक भागांतील मुलं-मुली येथे दाखल होऊन आपली प्रगती साधत आहेत. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुरचनाकार लॉरी बेकर यांच्या संकल्पेतून साकार झालेले टिळक मंदिर आणि संस्थेचे वसतिगृह, त्यांचे कौलारू छत वैशिष्टयपूर्ण आहे.
लाडघर - तासमतीर्थ
लाडघर - तासमतीर्थ
हा समुद्रकिनारा हे पर्सटकांचे एक आवडते ठिकाण आहे. या किना-यावरची रेती तांबडी असल्याने संपूर्ण किना-यावरचे पाणीही लालसर भासते. यामुळेच त्याला तामस किंवा तीर्थ म्हणतात. किना-यावरच श्री वेळेश्वर आणि एकमुखी दत्तमंदिर आहे.
लांबच लांब पसरलेल्या ह्या सागर किना-यावर ठिकठिकाणी छोट-छोटे काळे खडक दिसतात. त्यावर बसून लाटांचा खेळ पाहण्यात तास न तास कसे निघुन जातात ते कळत नाही. परंतु त्या जागी पाण्यात जाताना सुरक्षितता बाहगावी. खडकाळ भागात पाण्याला जास्त ओढ असते. रम्य सूर्यास्ताबरोबर सुरक्षित समुद्रस्नान ही आनंदाची पर्वणीच ठरते.
बुरोंडी
बुरोंडी
तामसतीर्थावरून डाव्या हाताला डोंगरउतारावर जी वस्ती दिसते तेच बुरोंडी गाव. सूर्यास्तानंतर गावातील लुकलुकणारे दिवे, पाण्यावर डुलणा-या मच्छीमार बोटीतील केदील, क्षितीजावर दिसणा-या होडयांच्या काळया आकृती हे सगळं आपल्याला एका वेगळयाच विश्वात घेऊन जाणारं आहे.
कोळथरे - मंदिराचे गाव, समंद्रकिनारा
कोळथरे - मंदिराचे गाव, समंद्रकिनारा
पांढ-या शुभ्र विस्तीर्ण वाळूच्या पुळणीचा कंठा माहून निसर्गाच्या कुशीत शांत पहुडलेले हे गाव आहे. गावातील मुख्य छोटा रस्ता आणि दोन्ही बाजूंना एकमेकांचा शेजार धरून उभी असलेली उतरत्या छपरांची अस्सल कोकणी घरे आपले लक्ष वेधून घेतात.
डोंगरकपारीतून येणा-या जीवंत झ-याला मढीचे पाणी म्हणतात. गावाच्या दक्षिणेला पाचक गुणधर्म असलेल्या या पाण्याचा एक छोटा तलाव निर्माण झाला आहे. याच ठिकाणी वरच्या बाजूस आजूबाजूच्या जंगलात मोर आढळतात. येथील सागरकिना-यावर काळया कवड्या विपुल प्रमाणात सापडतात. येथून जवळच्याच डोंगरात समुद्राचे पाणी वर्षांनुवर्षे खडकावर आपटून एक खोल विवर तयार झाले आहे. त्याला घळई म्हणतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत शिरते व उसळून त्याचा जलस्तंभ तयार होतो. त्यावेळी होणारा पाण्याचा मोठा आवाज वातावरण भारून टाकतो. किना-याच्या उत्तरेला डोंगरकपारीत एक गुहा तयार झाली आहे. त्याला वाघबीळ म्हणतात. त्यापुढे चालत गेल्यावर अतिशय गुळगुळीत आणि मऊशार वाळूचा पायाला स्पर्श होतो. त्या ठिकाणी समोर दिसते ती मदन नदी. या सर्व भागात फिरताना गावातील एखाद्या माहितगाराला सोबत नेल्यास सोयीचे होते.
श्री कोळेश्वराच्या मुख्य मंदिराखेरीज येथे श्री लक्ष्मी, विष्णुमंदिर, श्री गणपती, मारूती, जाखाय-काळकाय या ग्रामदेवता तसेच राममंदिर, दततमंदिर, खेममंदिर, दुर्गादेवी मंदिर, बापेश्वर, वाटेबुवा, ब्राह्मण आळीतील दत्तमंदिर आणि सोनार आळीतील गणपती मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. म्हणून कोळथ-याला मंदिराचे गाव असे म्हणतात. श्री कोळेश्वराचे मोठे मंदिर तीन भागांचे असून त्याभोवती दगड फरसबंदी तट, धर्मशाळा, मंदिरापर्यंत आणलेली चिरबंदी पाट अशा गोष्टी आहेत. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आता पांढ-या रंगात रंगवलेले आहे. या मंदिराची बांधणी, कळस, घुमट हे दुरून पाहताना मशिदीचा भास होतो. पूर्वी ज्यावेळी मुसलमान आक्रमकांची दहशत होती. त्यावेळी त्यापासून बचाव करण्यासाठी अशी फसवी रचना केली असावी असे वाटते.
याशिवाय या गावाचे वैशिष्टय म्हणजे देश-विदेशात प्रसिध्द असलेली आगोम ही औषध कंपनी. सूक्ष्म आयुर्वेद तंत्राने अनेक रोगांवर उपायकारक अशी औषधे येथे बववली जातात. कोळथरे सारख्या छोट्याशा गावात 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या उद्योगाची आवर्जून माहिती घ्यावी. महाजन कुटुबीय तत्परतेने आपले आगतस्वागत करण्यास उत्सुक आहेत.
दाभोळ - इतिहासकालीन वैभवसंपन्न प्राचीन बंदर
दाभोळ - इतिहासकालीन वैभवसंपन्न प्राचीन बंदर
प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.
दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सडयावरून खाली दसिणारं दृश्य पाहून कुणाही रसिकाला वेड लागेल. चिपळूनकडील येणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला आणि टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड, आपल्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता ही शोभा अवर्णनीय असते. कोकाणतल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिध्द बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मककेला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात.
इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्र विणत असते. अगदी 100 वर्षांपूर्वीपर्यत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुदर वस्रे विणली जात होती. शिवाशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या प्रचंड इतिहाच्या खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती, डोंगरकपारीतून दिसतील.
तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदू राजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि या बंदरात समुद्रमार्गे पोर्तुगूज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास 300 वर्षांपासून अधिक काळ मूसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींना इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींना आपल्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमान सत्तांनी बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया, मुसलमानांशी युध्दे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तल झाली वा ते इथून गेले. व् शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहिद झाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचे भक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.
दाभोळ परिसरातील देर्दे हद्दीत (बंदरातून नदीच्या दिशेली उंच टेकडीवर) असलेला अमीरुद्दीन बालापीर (बला म्हणजे उंच ठिकाण) हा हिंदु-मुसलमानांत विशेषत: दर्यावर्दी समाजात अत्यंत आदराचे स्थान असलेला पीर समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर आहे. दाभोळच्या गोडाऊनजवळ शेख फरीद, खडपकर वाडीसमोर खाडीत पानी पीर, बोरीबंदरात असलेला शहानवाल पीर, वणकर मोहल्ल्यातला कमालशाली पीर, दर्वेश यांच्या बागेतला हाजी सुलेमान पीर, हॉस्पीटलजवळचा कतलशेख पीर गावात आहेत. तर ओणनवसेच्या हद्दीवरचा खाजा खिजीर आणि वणौशीचे डोंगरावरचा जहाँबाज पीर हे गावाच्या सरहद्दीवर आहेत. परंतु दाभोळ गावातला सर्वांत प्रसिध्द पीर म्हणजे आझमखान पीर. या पीराला इ. स. 1874 सालात ब्रिटीश सरकारने दिलेली 18 रूपयांची सनद आजही चालू असून या दर्ग्याचे पुजारी इनुस मुजावर यांना ती मिळते.
बालापीरला ही इ.स. 1870 पासून 30 रूपयांची सनद असून ती परंपरेने नवसे येथिल मुजावर घराण्याला मिळते. आझमखान पीर हे ठिकाण दाभोळच्या मध्यभागी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. निसर्गाच्या कुशीतील अत्यंत शांत ठिकाणी झाडीमध्ये हा दर्गा आहे. याच्या आजूबाजूला असलेल्या लहान-मोठया असंख्य कबरी आणि तेथील नीरव शांतता गूढ वाटते व मन अंतर्मुख करते. विशेषत: आझमखानांच्या भव्य कबरीजवळ उभे राहिले की, इथे काही प्रचंड इतिहास घडला असावा. याचा सहज साक्षात्कार होतो. जुन्या हस्तालिखित आझामखान हिजरी 900 मध्ये म्हणजे इ.स.1494 मध्ये आल्याची नोंद आहे. त्यावेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. नागोजीने रत्नागिरी पासून समुद्रात आणि जमिनीवर या परकीयांशी टक्कर दिली.
दाभोळला तुंबळ रणसंग्राम झाला. त्यात आझमखान मरण पावले. परंतु नागोजीचा पराभव झाला. त्या अगोदर (1348-1500) येथे बहामनी राजवटीत दाभोळचे नाव मुस्तफाबाद यांच्या मुलाने ते बदलून हामजाबाद असे ठेवले. येथील जंगल साफ केले आणि गाव नव्याने वसविले. सुधारणा केल्या , बाजार सुरू केला. आझमखान यांचे शिर तवसाळ येथे आहे व धड दाभोळला आहे. त्यांचा ऊरूस 27 रजाग (शबे मेराज) ला मोठया इतमामाने साजरा होतो या प्रसिध्द पिरांशिवाय आणखी लहानसहान पीर आहेत. आता ऊरूस करण्याची प्रथा परिस्थितीनुरूप बंद पडत चालली आहे.
कुणी एखादा संबंधित इसम थोडाफार खर्च करून या शहिदांची याद करतो. पिरांच्या या दर्ग्याव्यतिरिक्त गावात अनेक मशिदी आहेत. दाभोळला 360मशिदी होत्या, अशी लोककथा सांगितली जाते. आजच्या घडीला मात्र ढोरसई मोहल्ल्यातील फरमान चबुतरा, तांबडी मोहल्ल्याच्यी फत्ताह मशीद, वणकर मोहल्ल्यातील जामे मशीद व बामणे मोहल्ल्यातील मुनी मशीद एवढया चार मशिदींतच दैनंदिन नमाज व इतर कामकाज चालू आहे. दाभोळमध्ये फड बंदर हे सर्वांत जुने बंदर आहे तेथे काकाची जुनी मशीद प्रसिध्द होती. त्या जागेवर आता ऊर्दू हायस्कूलची प्रचंड इमारत झाली आहे. खारवाडी जवळची अली मशीद ही एक जुनी प्रचंड पडीक मशीद आहे. इ.स. 1649 मध्ये औरंगजेबाच्या कारकर्दीमध्ये त्याचा या जिल्ह्याचा सुभेदार पीर अहमद अब्दला याने बांधलेली जुम्मा मशीद ही भग्नावस्थेत आहे आणि तिसरी एक जुनी प्रचंड मशीद समुद्रकिनारी सादतअली यांच्या स्मरणार्थ 1558 मध्ये बांधलेली आहे. त्या ठिकाणी 1875 साली लाकडावर कोरलेला मजकूर मिळालेला आहे. त्याच्या बाजूलाच ख्वाजा खिझरचा दर्गा आहे. या दोन्ही वास्तू शियापंथीय वाटतात. जामा मशिदीतील मिळालेला शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आहे.
त्या काळात दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-क-हाड-चिपळून-गुहागर रस्त्याचे विजापूर-गुहागर असेच नाव आहे. असा हा दाभोळ गाव अनेकवेळा बरबाद झाला. तितकेवेळातो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट दिली आणि तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.
इतिहासात डोकावाल तर दाभोळचे इतिहासकालीन महत्त्व सहज ध्यानात येते. दाभोळचे ऐतिहासिक स्थान सांगणा-या वास्तू आज भग्नावस्थेत आहेत. काहींची जेमतेम निशाणी आहे.तर काही ठिकाणी फक्त लाहन-लहान खुणा उरल्या आहेत.
भारताच्या पश्चिम किना-यावरील दाभोळ हे सर्वांत जुने बंदर आहे. या इतिहाससंपन्न प्राचीन दाभोळला आपण आवर्जून भेट द्यायला हवी.
चंडिकादेवी मंदिर
दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किमी. अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे 3।। फूट उंचीची काळया पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजा-यांची श्रध्दा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून आत वाकून जावे लागते. गुहेत उतरत्या वाटेवर पाय-या त्याच खडकात कोरलेल्या आहेत. त्या वरून सुमारे 5 ते 6 फूट अंतर आत चालत जावे लागते. ही वाट पूर्ण अंधारी आहे. या वाटेवर इतका काळोख आहे की पुढे कोणत्या दिशेला कसे जावे हे चटकन समजत नाही. परंतु डोके थोडे खाली वाकवून तसेच अंधारात अंदाजाने पुढे गेल्यावर देवीपुढच्या समईचा मंद प्रकाश दिसतो आणि हायसे वाटते. या ठिकाणी उजवीकडे वळल्यानंतर आपण देवीसमोर येतो. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याच्या प्रकाश चालतो. इतर कोणत्याही प्रकारचा प्राकाश किंवा कॅते-याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही असे येथील पुजारी सांगतात. तसेच देवीच्या उजवीकडे अंधा-या जागी असलेले एक भुयार थेट काशीला (?)जातके असेही पूजारी मंडळी सांगतात. ब-याच देवस्थांच्या ठिकाणी अशा लोकविलक्षण आख्यायिका प्रचलित आहेत. देवीचे मन प्रसन्न करणारे गूढगंभीर पण आश्वासक रूप पाहून पुढे वाकवूनच जावे लागते. या वेळी आपला उजवा हात खडकाला स्पर्श करून पुढे जात देवीला प्रदिक्षणा पूर्ण झाली की आपण पुन्हा मूळ जागी येतो व तेथून डावीकडे वळून आल्या मार्गाने परत बाहेर पडता येते.
हे स्थान पुरातन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा उल्लेख इतिहासात सापडतो. दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती. पुढील काळात मात्र हे स्थान लोकविस्मृतीत गेले. कालांतराने जमनापुरी नावाच्या दाभोळ मधील साधकास देवीने स्वप्राप्त दृष्टांत दिला. त्या नूसार त्यांनी या गुहेचा शोध घेतला व अनेक वर्षे ते देवीची निस्सीम भक्ती व पूजाअर्चा करत राहिले. अखेरीस चंडिकामातेच्या समोरच ते समाधिस्थ झाले. गुहेतून बाहेर पडल्यावर समोरच्या दगडी चौथ-यावर त्यांची व त्यांच्याच कुळातील आणखी एका साधकाची समाधी आहे. पुरी घराण्याकडेच आजही देवीची पूजा, अभिषेक करण्याचे हक्क आहेत. या चौथ-यावर तुळशी वृंदावन व छोटी-छोटी शिवलिंगे दिसतात. येथून खाली पाय-या उतयन गेल्यावर बारमाही झुळूझुळू वाहणारा थंड पाण्याचा झरा आहे.
मंदिरपरिसराच्या बाहेर दिसणारे तटबंदीचे पडके अवशेष दाभोळच्या किल्ल्याचे आहेत. या किल्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. इतर मंदिरापेक्षा वेगळे असे हे गुढरम्य स्थान आवर्जून पाहावे असे आहे.
दालेश्वर मंदिर
हे स्थान पुरातन असून सध्याचे मंदिर पेशवेकालीन म्हणजे 200 ते 250 वर्षांपूर्चीचे आहे. मूळ मंदिराला आता वरून पत्रयाचे उतरते छप्पर घतले आहे. दाभोळ गावातील इतिहासकालीन तळयापासून जांभ्या दगडातच खोदलेली पाखाडी (पाय-या) चढून गेल्यावर गावापासून थोडे उंचावर दाट झाडीत हे मंदिर लपलेले आहे. मंदिरात छोटासा सभामंडप असून, एका बाजूला गणपतीची मूर्ती आहे. चार पाय-या उतरून आत गेल्यावर महादेवाची रेखीव पिंड दिसते.या मंदिरासमोर दुस-या एका मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात. येथे मारूती व गरूडाची मूर्ती कोरलेली दिसते. शेजारीच एक गुहा असून दालभ्य ऋषीं येथे तपश्चर्या करत असत अशी आख्यायिका आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनाही इ.स.1661 मध्ये इथे दर्शन घेतल्याचे इतिहास सांगतो.
माँसाहेब मशीद
दाभोळच्या सर्व जुन्या वास्तूंमध्ये चांगल्या स्थितीमध्ये उभी असलेली भव्य मशीद म्हणजे दाभोळ धक्क्यावर उतरताच प्रवाशांचे लक्ष वेधून घेणरी माँसाहेबांची मशीद. एवढी भव्य, एवढी देखणी आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असलेली मशीद निदान कोकणपट्टीत तरी दुसरी नाही. इतिहासकाळातील ही कला-सौंदर्याची आणि भव्यतेचा साक्षात्कार घडविणारी शिल्पाकृती दाभोळचे मोठे आकर्षण आहे. 60X70 फूट लांबी-रूंदी असलेल्या इमारतीला चार मिनार आहेत आणि 75 फूटांचा भव्य घुमट आहे.
विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. तिच्या उंच जोत्याला प्रशस्त दगडी पाय-या आहेत. जोत्याच्या पोटातही काळी खोल्यांची रचना आहे. या मशिदीभोवती पूर्वी वाटोळा उंच तट होता. तो आता दिसत नाही. कंपाऊंडमध्ये संदर बगीचा होता आणि समोरच्या मोठया चौथ-याच्या मधोमध एक अप्रतिम कारंजे होते. कंपपाऊंडमध्ये विहीरही होती. इतकेच नाही, तर मिनारावर सोन्याचा पत्राही होता.
या मशिदीचा जो इतिहास लिहिलेला आढळतो त्याप्रमाणे विजापूरची राजकन्या आयेषबिबी (माँसाहेबं) सन 1659 मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. परंतु हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. तिच्या सोबत 20 हजार घोडेस्वार वगैरे फार मोठा लवाजवा होता व लाखो रूपयांची संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा चिंतेत माँसाहेब असता बरोबर असलेल्या काझी व मौलवींनी सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली. तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते. या कामी 15 लाख रूपये खर्च आला. ती मशीद कामीलखान नावाच्या शिल्पकाराने बांधली. याला अंडा मशीद असेही म्हणतात. मात्र हे नाव का पडले याचे समर्पक कारण कळत नाही.
खाडीतून बोटीने फेरफटका मारताना उंच डोंगराच्या पार्श्वभूमीवर नारळी-पोफळीच्या आडून डोकावणारे मिनार आणि चिंचोळया पट्टीतला दाभोळ गाव हे दृष्य मनमोहक दिसते.
दाभोळ बंदर
दाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात. दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरील कोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेले असतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरून धक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेच माशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात. या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारं पाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो.
बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावं. चिपळूनहून येणा-या या वाशिष्ठी नदीच्या खाडीचे दृश्य विहंगम दिसते. या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे तर अंजनवेल गावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्राकशही नजरेस पडतो. डोंगरावर आधुनिकतेकडे नेण्या-या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.
दाभोळ बंदरातून दर तासाला सुवर्णदुर्ग शिपिंग अॅन्ड मरिन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूक चालते. यामुळे आपण स्वत:च्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळून-गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे, रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.
शेडवई - प्राचीन मूर्ती
शेडवई - प्राचीन मूर्ती
मंडणगड-दापोली रस्त्यावर मंडणगडपासून 12 किमी. अंतरावर दहागाव येथे उजवीकडे एक फाटा फुटतो. या रस्त्याने 7 कि.मी. वर शेडवई हे गाव आहे. या गावातच मुख्य रस्त्यापासून उजव्या हाताला कच्च्या रस्त्याने आत गेल्यावर काजू फॅक्टरीच्या दारातच खळाळणा-या ओढयाच्या काठी दाटी झाडीत एका जीर्णोध्दारीत मंदिरात सुमारे 800 वर्षे जुनी, 12 व्या शतकातील, काळ्या पाषाणात घडवलेली विष्णूची मूर्ती आढळते. उत्कृष्ट कोरीवकाम, सुबक आकार व कलाकुसर असलेल्या या मूर्तीच्या हाती पद्म, शंख, चक्र, गदा असून प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे बाजूला लक्ष्मी व गरूडाचीही मुर्ती आहे. दुर्लक्षित अवस्थेत असलेली ही श्री केशरनाथ मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. अशा पद्धतीच्या एकूण तीन मूर्ती जिल्हायात असून एक शेडवई येथे, दुसरी सडवे येथे व तिसरी टाळसुरे येथे आहे. या मूर्तीची घडण एकसारखी असून, एकाच शिल्पकाराने त्या घडविल्या असल्याचे सांगितले जाते.
या रस्त्यावरच शेडवईच्या अलीकडे दहागावपासून 3 कि.मी. वर घराडी हे गाव लागते. या गावात आशाताई कामत, प्रभाताई आणि सहकारी यांनी चालवलेली रत्नागिरी जिल्ह्यातील स्नेहज्योती नावाची एकमेव अंध शाळा आहे. आजूबाजूच्या गावातील, गरीब घरातील अंध मुलांसाठी अगदी घरच्या सरखे वातावरण या शाळेमध्ये आहे. सहानुभूती म्हणून नव्हे तर, त्यांच्या जिद्दीचे कौतुक आणि आपल्यातील माणूसपण जपण्यासाठी आपल्या पर्यटन सहलीमध्ये अशा ठिकाणांना भेट देण्यासठी थोडा वेळ जरूर काढावा.
पालगड
पालगड
सानेगुरूजी स्मारक
मंडणगड-दापोली रस्त्यावर दापोलीच्या अलीकडे 21 कि.मी. वर पालगड हे गाव लागते. पू.साने गुरूजींचे हे जन्मगाव. त्यांच्या घराचे नूतणीकरण करून त्याचे स्मारक रण्यात आले आहे. आतमध्ये पू.साने गुरूजींच्या जीवनकालातील महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटोंद्वारे दर्शन घडवले आहे. साने गुरूजी विद्यालयाशेजारी असलेल्या ह्या पवित्र स्मारकास अवर्जून भेट देऊन नतमस्तक व्हावे.
पालगड किल्ला
या गावाजवळच पालगड किल्ला आहे. पालीसारखा या किल्ल्याच्या माथ्याचा आकार असल्याने यास पूर्वी पालिळ म्हणत असत. त्याचे पुढे पालीगड-पालगड असे नामांतर झाले. गावाची वसाहतही त्यानंतरची आहे. किल्ल्याच्याच नावाने गावाचे नामांतर झाले. फारशा परिचित नसलेल्या या किल्ल्यावर जाण्यास गावातून 1।।-2 तास लागतात. प्रत्यक्ष किल्लयावर इमारतींचे भग्नावशेष असून, एक-दोन तोफा इतरत्र पडलेल्या आहेत. एक विहीरही आहे. ट्रेकिंग, साहस आणि मनमुराद पायी भटकंतीची आवड असणा-यांनी या दाट झाडीतील किल्ल्याची मोहिम काढण्यास हरकत नाही. मात्र गावातून रस्त नीट विचारुन घ्यावा
गव्हे - नर्सरी व्हिलेज
गव्हे - नर्सरी व्हिलेज
दापोलीतील गव्हे हे गाव नर्सरींचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात लहानमोठया अनेक नर्सरीज् आहेत. यामध्ये आंब्याच्या अनेक जाती, इतर फळझाडे, शोभेची फुलझाडे, वेली, इनडोअर-आऊटडोअर प्लँटस् अशी अनेक प्रकारची रोपे पाहावयास व विकत मिळतात. इथल्या कॉप्स नर्सरीमध्ये शेकडो प्रकारच्या औषधी, दीडशे प्रकारच्या जास्वंदी, फर्न, बोगनवेल, इ.चे अनेक प्रकार आणि वैशिष्टय म्हणजे या नर्सरीने घरातल्या छोटयाशा बागेत टबमध्ये उमलणारी कमळे आणि कंडीत फुलणारी बकुळीची कलमे विकसित केली आहेत. याशिवाय येथे व दापोली परिसरात आशिका रोझरी, छाया, वेलकम, प्रिया, रेनबो, लक्ष्मी अशा कितीतरी नर्सरीज् आहेत. या परिसरामध्ये एकूण 700-800 प्रकारची रोपे मिळतात.
कोकण मेवा
कोकण मेवा
अंजर्ले, दापोली आणि आसपासच्या गावांत मिळणारा, वर्षभर टिकणारा कोकणमेवा म्हणजे रूची आणि आस्वादासाठी असलेल्या विविध पदार्थांची भली मोठी यादीच आहे.
कोकण सिरप, आमसुले, कोकण आगळ, कोकम तेल, लोणवळा कोकम, कोकम मनुका, हापूस आंबा पोळी, हापूस आंबा मावा, हापूस मँगो पल्प, हापूस आंबावडी, हापूस आंबा मोदक, हापूस आंबास्वीट बार, हापूस आंबा सिरप, हापूस मुरांबा, सूखांबा लोणचे, आंबा रायते, छुंदा, सुखा काजूगर, ओला काजूगर, तळलेले गरे, फणसपोळी, फणस केक (सांदण), कोकण खजूर, फणस स्वीट बार, आवळा सिरप, आवळा मावा, आवळा पेठा, आवळा जॅम, आवळा लोणचे, आवळा ठेचा, मोरावळा, आवळा चूर्ण, आवळा सुपारी, आवळा तेल, आवळा काठी, करवंद सरबत, करवंद वडी, करवंद लोणचे, करवंद स्वीट बार, करवंदपल्प, करवंद जॅम, गहू सत्व, दुधातील नाचणी सत्व, ताकातील नाचणी सत्व, नाचणी सत्व (शुगर फ्री), नाचणी सत्व स्वीट बार, नाचणी पापड, घावन पीठ, केळयाचे पीठ, कुळीथ पीठ, कुळीथ स्वीट , नमकीन (कुळीथ), कुडयाचा सांडगा, फोडणी मिरची, सांडगी मिरची, कोकणी ठेचा, जांभूळ ज्यूस, जांभूळ चूर्ण, लिंबू लोणचे, लिंबू चटणी, लिंबू सिरप, सुंठी पावडर, आल्याचा रस, पाचक रस, अननस सिरप, अननस पाक, अननस जॅम, मूगडाळ खिचडी (इन्स्टंट), मेतकूट, शुध्द मध, कचरा सत्त्व, पोहा पापड, मिरगुंड, उडीद पापड, बटाटा पापड, डांगर, भाजणी, आमचूर, काळमिरी, जायफळे, जायपत्री, तमालपत्री, दालचिनी, गोडा मसाला, अंबा, फणस, काजू, रामफळ, पपई, पपनस, शेवग्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, पांढरा जांब, आंबट जांब, केळी, नारळ, शहाळेगावठी पोहे, तांदूळ, आठिळा, अडकुळी, गुलकंद.
अंजर्ले, दापोलीच्या बाजारात तसेच काही मंदिरपरिसरात हे पदार्थ उपलब्ध असतात. त्यामुळे निसर्गसौंदर्याबरोबरच ही रससंपदा आपल्या आनंदात भर पडते.